वाळूज एमआयडीसीतील तरुणीच्या हत्याकांडाचे गूढ उकलले!; प्रेमविवाह, पुन्हा दुसरे नाते, संतापलेल्या आईनेच घोटला लेकीचा गळा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुली येथे उघडकीस आलेल्या तरुणीच्या हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणात समोर येत असलेली पार्श्वभूमी अधिकच धक्कादायक असून, प्रेमविवाहानंतरचा तणाव आणि नव्या नात्याला आईचा विरोध हेच या भीषण घटनेमागील मुख्य कारण असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.

या घटनेत मृत तरुणीचे नाव नंदिनी राजू धिवरे (वय २० वर्षे) असे असून, तिची आई भारती उमेश साबळे (वय ३५ वर्षे) व सावत्र वडील उमेश गोविंद साबळे (वय ४० वर्षे, रा. वडगाव कोल्हाटी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नंदिनी हिने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र, दोन-तीन महिन्यांपूर्वी पतीने तिला सोडून दिल्याने ती माहेरी परतली. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर नंदिनीचे पुन्हा एका तरुणासोबत सूत जुळल्याची माहिती पुढे आली आहे. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत होते.

कुटुंबाची बदनामी होईल, समाजात काय बोलले जाईल, या भीतीने आई संतप्त होती. हा संताप अखेर जीवघेणा ठरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सुमारे २० दिवसांपूर्वी आई-मुलगी वडगाव कोल्हाटी येथे राहायला आल्या होत्या. परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून सतत भांडणाचे आवाज येत होते. मात्र, हा वाद इतका टोकाला जाईल याची कल्पना कुणालाही नव्हती.

घटनेच्या दिवशी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपने गळा आवळून नंदिनीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संतापाच्या भरात आई भारती साबळे हिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. हत्येनंतर मृतदेह गादीत गुंडाळण्यात आला. रात्री सुमारे १०.४० वाजता संशयास्पद हालचाली दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता गादीत गुंडाळलेला नंदीनीचा मृतदेह आढळून आला. तपासात मृतदेह कन्नड घाट येथे नेऊन ड्रममध्ये टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा कट करण्यात आला होता. तत्पूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणून उधळला गेला आहे.

हत्या घडली तेव्हा सावत्र पिता उमेश गोविंद साबळे बाहेर असल्याचे सांगितले जात असले तरी, नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याने मदत केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या पथकात पोलीस अंमलदार राजाराम वाघ, संदीप तागड, समाधान पाटील, नितीन इनामे, जयेश साळुंखे, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, सुहास मुंडे, गजानन कसबेवाड, लखन गुसिंगे आणि शिव नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोबाइल कॉल रेकॉर्ड, नातेसंबंधांची पार्श्वभूमी आणि घटनास्थळावरील पुरावे यांची सखोल तपासणी सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!

Latest News

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद! नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
वाळूज एमआयडीसीतील तरुणीच्या हत्याकांडाचे गूढ उकलले!; प्रेमविवाह, पुन्हा दुसरे नाते, संतापलेल्या आईनेच घोटला लेकीचा गळा
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software