- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरातही टीडब्ल्यूजे घोटाळा!; ३८० हून अधिक गुंतवणूकदारांना १० कोटींचा गंडा, आतापर्यंत ३...
छत्रपती संभाजीनगरातही टीडब्ल्यूजे घोटाळा!; ३८० हून अधिक गुंतवणूकदारांना १० कोटींचा गंडा, आतापर्यंत ३४ गुंतवणूकदारांची पोलिसांत धाव... काय आहे प्रकरण जाणून घेऊ...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टीडब्ल्यूजे कंपनीने छत्रपती संभाजीनगरकरांनाही गंडवल्याचे समोर आले आहे. या कंपनीने राज्यभरातील ११ हजार गुंतवणूकदारांना शक्य नसलेला परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १२०० कोटींचा घोटाळा केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३४ गुंतवणूकदारांनाही या कंपनीने गंडवले असून, त्यांनी सिडको एमआयडीसी पोलिसांत धाव घेतल्यानंतर समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, अमित विश्वनाथ बालम, किरण कुंडले या चौघांसह कंपनीच्या २४ जणांविरुद्ध बुधवारी (१८ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला.
आमिषाचीच उड्डाणे...
१० लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्रतिमहा ३ टक्के परतावा, १० लाखांच्यावर ४ टक्के परतावा, २५ लाखांच्या वर गुंतवणूक केल्यास ५ टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मिळालेल्या नफ्यावर २ टक्के टीडीएसही कपात होईल, असे सांगण्यात आले. यासाठी करार करण्यात आला होता, हे विशेष. कंपनीने राज्यभरात २० ठिकाणी कार्यालये थाटली होती. समीर नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, अमित बालम, किरण कुंडले यांच्यासह २४ जणांवर राज्यात पुणे, चिपळूण, यवतमाळ, नागपूर, रत्नागिरीसह एकूण १६ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत.
घोटाळेबाजारांना चौकशीसाठी शहरात आणणार
गुन्हे दाखल होताच नार्वेकर, बालम गुजरातमध्ये पळून गेले होते. ठाणे पोलिसांनी त्यांना २९ जानेवारीला अटक केलेली आहे. या कंपनीने केवळ सामान्यांनाच नाही तर वरिष्ठ शासकीय अधिकारी, राजकीय नेते, पोलीस अधिकारी, अंमलदारांनाही गंडा घातला आहे. पुणे व रत्नागिरी जिल्ह्यात १६०० पोलिसांना चुना लावल्याचे समोर आलेले आहे. नार्वेकर दाम्पत्य व बालम सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगरात आणण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल. यात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी केले आहे.

