- News
- पॉलिटिक्स
- महापौर पदाचा गुंता कायम, आता निर्णय प्रदेश कमिटी घेणार!; दुसरीकडे भाजपविरुद्ध आघाडीसाठी प्रयत्न, एम...
महापौर पदाचा गुंता कायम, आता निर्णय प्रदेश कमिटी घेणार!; दुसरीकडे भाजपविरुद्ध आघाडीसाठी प्रयत्न, एमआयएम शिंदे गटाला पाठिंबा देण्यास तयार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा महापौर कुणाला करायचे, यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांत एकमत झाले नाही. अखेर स्थानिक कोअर कमिटीने प्रदेश कमिटीकडे महापौरपदासह उपमहापौर, गटनेता या पदांसाठी प्रत्येकी ४ नगरसेवकांची नावे पाठवली आहे. प्रदेश स्तरावरील नेते कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे भाजपविरोधात आघाडी तयार करण्याचेही प्रयत्न सुरू असून, एमआयएमने शिंदे गटाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना अक्षरशः झिडकारले आहे. ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढली, त्यांचा पाठिंबा कधीच घेणार नाही, त्यांनी आम्हाला दिला तरी घेणार नाही, असे शिरसाट म्हणाले. काँग्रेसने एमआयएमला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असून, तसे सूतोवाच शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी केले आहे. दरम्यान, तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नाची भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने...’ म्हणत खिल्ली उडवली आहे.
महापौरपदाची निवडणूक लढण्याची तयारी एमआयएमने केली आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले, की भाजपविरोधात ५८ लोक आहेत. आम्ही आमची चाचपणी सुरू केली असून, भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही शिंदे गटालाही पाठिंबा द्यायला तयार आहोत. काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ म्हणाले, की भाजप विरोधातील आघाडीसाठी काँग्रेस सकारात्मक आहे. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे म्हणाले, की महापौरपदासाठी आकडे जुळत नाहीत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचा महापौर होत असेल तर पाठिंबा देऊ. भाजपविरोधातील आघाडीला शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी झिडकारून लावले. एमआयमचा पाठिंबा घेणार नसल्याचे ते म्हणाले. त्यावर शरद पवार गटाचे नगरसेवक नवीन ओबेरॉय म्हणाले, की शिंदे गटाला एमआयएमची अडचण असेल तर मी नेतृत्त्व करायला तयार आहे. शहरात धर्मनिरपेक्ष महापौर होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. या सर्व चर्चेत वंचित बहुजन आघाडीने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद खुले (सर्वसाधारण) आहे. समर्थनगर प्रभागाचे समीर राजूरकर, मयूर पार्क प्रभागाचे विजय औताडे आणि रोजाबाग प्रभागाचे राजगौरव वानखेडे महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. महापालिकेत भाजप ५७, एमआयएम ३३, शिंदे गट १३, ठाकरे गट ६, वंचित बहुजन आघाडी ४, राष्ट्रवादी शरद पवार गट १, काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे.
अर्ज वितरण आजपासून
महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज वितरण आज, ४ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) दुपारी ३ पर्यंत अर्ज वाटप होऊन, त्याच दिवशी सायंकाळी ६ पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम वेळ आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारीला सकाळी ११ ला महापालिकेची विशेष सभा होईल. सभेत अर्जांची छाननी होऊन, १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी दिले जातील. उमेदवारांची नावे मराठी वर्णनुक्रमाने घोषित करून ज्या उमेदवाराचे नाव पुकारले जाईल, त्याच्या समर्थनार्थ नगरसेवकांना हात उंचावून मतदान करता येईल.

