पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण तालुक्‍यात निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर आला आहे. मतदार यादीत तब्‍बल २५ हजार ८२० मतदारांची नावे दोन ठिकाणी आली आहेत. यात शहरातील २ हजार ६९८ तर तालुक्‍यातील २३ हजार १२२ मतदारांचा समावेश आहे. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्‍य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर झाली, त्‍यानंतर ही धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

तहसीलदार ज्‍योती पवार यांनी याबाबत सांगितले, की दुबार नावांची चौकशी सुरू केली असून, एका ठिकाणचे नाव वगळण्यात येईल. पैठणचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांनी याबाबत ३१ जुलैला निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती. दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांची  यादीच त्‍यांनी निवेदनासोबत सादर केली. पिसे यांनी सांगितले, की दुबार नावे शोधण्याचे व वगळण्याचे काम निवडणूक विभागाचे आहे. त्‍यांनी शोधमोहीम राबवून नावे वगळावीत, असे ते म्‍हणाले.

नगर परिषद हद्दीत सध्या ३५ हजार ७२२ मतदार असून, त्‍यातील २ हजार ६९८ मतदारांची नावे तालुक्‍यातील अन्य ग्रामपंचायतींच्या यादीतही नोंदवलेली आहेत, तर तालुक्‍यात एकूण ३ लाख २ हजार २३१ मतदार आहेत. त्‍यातील २३ हजार १२२ जणांची नावे दोन ठिकाणी आहेत. ढोरकीन, मुधलवाडी, केकत जळगाव, दाभरूळ, विहामांडवा, बिडकीन, गेवराई बाशी, चितेगाव, सोलनापूर, आखतवाडा, पुसेगाव, वाघुंडी, तेलवाडी आदी गावांत प्रामुख्याने हा प्रकार घडला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software