चिकलठाणा, गजानननगरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा येथील म्‍हाडा कॉलनी (मूर्तिजापूर) आणि गजानननगर येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलींचा शोध सुरू केला आहे.

बाहेर जाऊन येते म्हणून गेली...
१६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना चिकलठाणा येथील म्‍हाडा कॉलनीत (मूर्तिजापूर) समोर आली आहे. मंगळवारी (१२ ऑगस्ट) मुलीच्या आईने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. मुलीच्या आईने तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍या एका वाहनाच्या शोरूममध्ये गाड्या धुण्याचे काम करतात. रविवारी (१० ऑगस्ट) सकाळी १० ला घरी असताना त्‍यांची मुलगी मी बाहेर जाऊन येते, असे सांगून गेली. त्यानंतर खूप वेळ झाला तरी ती परतली नाही. तिला कॉल केला असता तिने उचलला नाही. थोड्या वेळाने तिचा फोन स्विच ऑफ आला. तिचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती कोठेही मिळून आली नाही. नातेवाईकांकडेही ती गेली नव्हती. सिडको एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास लहाने करत आहेत.

साखर आणण्यासाठी दुकानात गेली...
गारखेडा परिसरातील गजानननगर येथून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आज, १३ ऑगस्‍टला तक्रार दिली. अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मुलीची आई खासगी नोकरी करते. त्‍यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (१२ ऑगस्‍ट) सकाळी साडेआठला त्‍या कामावर गेल्या. दुपारी २ ला घरी परल्या असता सासूने सांगितले, की मुलगी सकाळी साडेअकराला साखर आणण्यासाठी दुकानात जाते, असे सांगून घराबाहेर पडली तशी परतली नाही. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील मस्के करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software