प्रेमात लग्नाआधी मोठमोठी स्वप्ने, लग्‍न होताच लाथा अन्‌ बुक्के!, चिकलठाणा पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणीने सांगितली आपबिती

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ज्‍याच्यावर प्रेम केले, त्‍याच्यासोबत लग्‍न झाल्याने ती स्वतःला नशीबवान समजत होती. प्रेमात आकंठ बुडून तिने घरच्यांचा विरोध पत्‍करून त्‍याच्यासोबत सातफेरे घेतले. पण वर्षभरातच त्‍याचे खरे रुप तिला कळले. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो तिला चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण करू लागला. माहेरावरून पैसे आण म्‍हणून शारीरिक व मानसिक छळ करू लागला. अखेर तिने शुक्रवारी (८ ऑगस्ट) चिकलठाणा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी तिचा पती, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

२५ वर्षीय वृषाली (नाव बदलले आहे, रा. पिसादेवी रोड, हर्सूल) हिने चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, तिने अनिकेतसोबत (नाव बदलले आहे) प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर एक वर्ष तिला त्याने चांगले नांदवले. त्यानंतर अनिकेत नेहमी दारू पिऊन यायचा. शिवीगाळ करत रात्री अपरात्री मारहाण करायचा. शारीरिक व मानसिक त्रास देत होता. खर्चासाठी तिला पैसे देत नव्हता. नेहमी चारित्र्यावर संशय घ्यायचा. सासूला प्रेमविवाह मान्य नसल्याने ती नेहमी वृषाली आणि अनिकेतमध्ये भांडण लावून देत असे.

संसारात ढवळाढवळ करत होती. सासरे वृषालीच्या जॉब करण्याला विरोध करत असत. त्याचा मनात राग धरून ते दारू पिल्यानंतर तिला शिवीगाळ करत. १८ जून २०२१ रोजी लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते १० जुलै २०२५ पर्यंत सासरी असताना पती, सासू, सासऱ्यांनी संगणमत करून माहेराहून १ लाख २० हजार रुपये आण, असे म्हणून, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन तिला चापटबुक्क्यांनी लाथेने मारहाण करून शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला. अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेखा सौंदरमल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software