जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ग्राहकाला आपण दैवत मानतो. असा हा ग्राहक आपल्याकडे उदरभरणासाठी येतो तेव्हा त्याचा नैवेद्य हा भेसळमुक्त आणि सुरक्षित असावा याची दक्षता सर्व अन्न व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, १३ ऑगस्टला हॉटेल व अन्न व्यावसायिकांना केले.

आगामी सण उत्सव काळात खाद्यपदार्थ विक्री वाढते. अशा वेळी लोकांना शुद्ध, सकस आणि निर्भेळ, भेसळमुक्त अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा’ हा उपक्रम राबविला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल्स व अन्न व्यावसायिकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली. अन्न सुरक्षा नियम व निकषांबाबत हॉटेल्स व्यावासायिकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन  द.वि. पाटील, सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्र.प. सुरसे, श्रीमती सु.त्रि. जाधवर, श्रीमती वर्षा रोडे, एस.बी. तायडे, मो. फ. सिद्दीकी, पी.एस. अंजिठेकर तसेच हॉटेल्सचालक, अन्न व्यावसायिक उपस्थित होते.

आगामी सण व उत्सवाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिठाई, फरसाण, सुका मेवा अशा अन्नपदार्थांची विक्री होत असते. मागणी जादा असल्याने भेसळीची शक्यता वाढते. अशावेळी  घातक घटकांनीयुक्त मिठाईपासून नागरिकांचे रक्षण करणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून  विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.  या तपासणीत  मिठाईचे उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी, उत्पादनासाठी वापरण्यात येणारे दुध, खवा, मावा, तूप, साखर, मैदा आणि इतर घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, कुणीही अन्न व्यावसायिक जाणीवपूर्वक भेसळ करत नसतात. मात्र अल्प लाभाच्या मोहापायी बऱ्याचदा असे कृत्य घडते. आपल्या फायद्यासाठी आपण कुणाच्या आरोग्याशी खेळू नका. ग्राहकाला आपण देव मानतो त्या देवाचा नैवेद्य हा भेसळमुक्त आणि शुद्ध असावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षणात अन्न सुरक्षा नियम, स्वयंपाक घरातील स्वच्छता, किटक प्रतिबंध, अस्वच्छ सवयींचा त्याग याबाबत माहिती देण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software