छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : किरकोळ विक्री दरापेक्षा जादा दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ मद्य विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून, त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपये दंड आकारला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, की जून २०२५ मध्ये मद्याची दरवाढ करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही अनुज्ञप्तीधारकांनी कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (MRP) जास्त दराने मद्याची विक्री केल्याची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागास प्राप्त झाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात सर्वंकष विशेष मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ देशी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अशा मद्य विक्रेत्यांवर  साडेआठ लाख रुपयांचा दंड आकारला. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशी कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध परवाना निलंबन आणि कायमस्वरूपी रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software