छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू महिलांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक घेतले. नंतर त्यांच्या नावावर वेगवेगळ्या फायनान्स कंपन्याकडून लाखो रुपयांचे कर्ज उचलले. १२ हून अधिक महिला सध्या समोर आल्या असून, २२ लाखांचा कर्ज घोटाळा समोर आला आहे. याहून अधिक संख्येने महिला फसवले गेलेल्या असू शकतात. आकडाही कोटीच्या घरात जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. सिडको पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा सर्व घोळ २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान परिचय महिला बचत महासंघ व गृहउद्योग संलग्न ग्रो स्मार्ट रिटेल इंडीया प्रा. लि. या संस्थेच्या अन्वीता योगेश काची संस्थापक अध्यक्ष, हर्षा विजय अंभोरे उप सहाय्यक (रा. नवजीवन कॉलनी), हेमंत राजेश रसाळ यांनी केला. रोहिणी शरद गजमल (वय ३२, रा. एसटी कॉलनी, मुकुंदवाडी, एन २, सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती, मुलांसह राहतात. त्यांचे पती ओला इलेक्ट्रीकल कंपनीत नोकरीला आहेत. सन २०२२ मध्ये अन्वीता काची, हर्षा अंभोरे व हेमंत रसाळ असे तिघे त्यांच्या घरी आले. त्यांनी रोहिणी यांना सांगितले की, परिचय महिला बचत महासंघ व गृहउद्योग संलग्न ग्रो स्मार्ट रिटेल इंडीया प्रा. लि. नावाची आमची संस्था असून, या संस्थेच्या अंतर्गत बचतगट सुरू करण्यासाठी व सदस्य होण्यासाठी दीड हजार रुपये रजिस्ट्रेशन करण्यासाठी खर्च आहे.
आमच्या संस्थेचे ऑफीस नवजीवन कॉलनी, गणपती मंदिराजवळ, सिडको, एन ११ येथे आहे. या ऑफीसमध्ये काम देण्यात येईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रीक दुचाकी गाडी मिळेल, असे सांगितले. त्यामुळी रोहिणी यांनी स्वतःचे, त्यांची आई मंगला काकासाहेब कुबेर व पूजा सचिन हनुमंते अशा तिघींचे प्रत्येकी दीड हजार रुपये सभासद शुल्क हर्षा अंभोरे हिच्याकडे भरले. आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो व बँक पासबुकची छयांकीत प्रत हर्षा अंभोरे हिच्यासोबतच्या हेमंत रसाळ याच्याकडे दिल्या. हेमंत रसाळ याने सांगितल्या प्रमाणे प्रत्येक कागदपत्रावर सह्या केल्या. त्यानंतर सुमारे सन २०२३ त्यांनी कॉल करून रोहिणी यांना कळवले की, तुम्ही आमच्या ऑफीसमध्ये नोकरीसाठी या. तुम्हाला १५ हजार रुपये महिना पगार देण्यात येईल. रोहिणी यांनी सप्टेंबर व ऑक्टोबर २०२३ रोजी त्या कार्यालयात नोकरी केली. ऑफीसमध्ये हर्षा अंभोरे या बसत असत. प्रत्येक सभासद होणाऱ्या महिलेचे पैसे त्या स्वतः घेत असत. त्यानंतर दिवाळी असल्याने कार्यालयास सुटी असल्याचे सांगून ऑफीस बंद केले.
त्यानंतर ऑफीस पुन्हा सुरू झालेच नाही. दोन महिने काम केल्याचा पगारसुद्धा रोहिणी यांना देण्यात आला नाही. नोव्हेंबर २०२३ मध्ये हर्षा अंभोरे व अन्वीता काची यांनी फोन करून कळविले की, तुमच्या गाड्या थोड्याच दिवसात येणार आहेत. तुम्ही ऑफीसमध्ये येऊन गाडी तुमच्या नावावर करण्याच्या कागदपत्रावर सह्या करा. त्यामुळे रोहिणी ऑफीसमध्ये गेल्या. तिथे हर्षा अंभोरे, हेमंत रसाळ हजर होते. त्यांनी सांगितलेल्या कागदपत्रावर रोहिणी यांनी सह्या केल्या आहेत. त्यानंतर हर्षा अंभोरे व अन्वीता काची यांनी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी फोन करून कळवले की, नवजीवन कॉलनी येथील ऑफीसमध्ये तुमच्या गाड्या आल्या आहेत, त्या तुम्ही घेऊन जा. त्यामुळे रोहिणी या २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी गेल्या असता रात्री साडेदहापर्यंत बसवून ठेवले. रात्री साडेदहाला इलेक्ट्रीक स्कूटर त्यांना दिली. ही गाडी फक्त दोन ते तीन दिवसच चालली. गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजवर दाखवली असता कळले की, गाडी नवी नसून जुनी आहे. सर्व पार्टस नादुरुस्त असून बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे. तेव्हापासून ही गाडी बंदच आहे.
त्यानंतर रोहिणी यांना एका मोबाइलवरून कॉल आला व त्यांनी सांगितले, की त्यांच्या नावे गिरनार कॅपीटल प्रा.लि. या कंपनीचे लोन काढलेले आहे व त्याचा EMI थकीत आहे. नंतर पुन्हा एक कॉल आला, त्यावर बोलणाऱ्या महिलेने सांगितले, की त्यांच्या नावे रुपे फायनान्स कंपनीचे गाडीचे लोन असून त्याचे हप्ते थकीत आहेत. रोहिणी यांनी त्यांना या संदर्भात काही माहिती नाही, असे सांगितले. त्यांनी कर्जाबाबतच्या माहितीची पीडीएफ पाठवली. त्यात रोहिणी यांच्या नावावर १ लाख ५१ हजार ९८० रुपयांचे कर्ज २२ टक्के व्याजदराने काढलेले असल्याचे दिसले. जानेवारी २०२५ पासून कर्जाचे हप्ते थकीत आहेत. रोहिणी यांच्यासारखे संगिता प्रमोद साठे, वैशाली ज्ञानेश्वर नाईक, सोनाली शशिकांत शिंदे, लक्ष्मी परमेश्वर वैद्य, ज्योती सुभाष वाघ, करुणा बाबासाहेब मगरे, सुवर्णा सुनील पेहरकर, दैवशाला विलास घोरपडे, सचिन रामदास कांबळे, निकिता अशोक वाघ, पुष्पा सुखदेव भालेराव, उषा सुनील साबळे, मीनाक्षी संतोष टोकटे व इतर महिलांची फसवणूक केली असून, एकूण २२ लाख २० हजार रुपयांचे कर्ज रोहिणी व इतरांच्या नावे काढून काहींना गाडी दिल्या व काही महिलांना गाडी दिल्याच नाहीत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हरिदास मैदाड करत आहेत.