- News
- पॉलिटिक्स
- खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटा...
खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन लता सूर्यभान वाघामारे यांचे खापर पंजोबा दिवंगत पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात २३ एकर ३० गुंठे जमीन होती. ते या जमिनीचे प्रतिबंधित मालक होते. हैदराबाद संस्थानात ती त्यांना बहाल करण्यात आली होती. १९५७ मध्ये प्रमाणपत्राच्या आधारे बहाल केलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर पडीक होती. ही जमीन पुढे महाराष्ट्र विकास मंडळास संपादीत करून देण्यात आली होती. समृद्धी महामार्गासाठी ही जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश झाल्यानंतर त्याचे बाजारमूल्य ११५० कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले. यातील तीन एकर जमीन कुळ कायद्याने जावेद रसूल शेख यास हिबानामा करून देण्यात आली. ज्याची किंमत १५० कोटी रुपये आहे. जावेद शेख हे खा. भुमरे यांचे वाहनचालक आहेत. १९७१ मध्ये हिबानामा केला आहे. मात्र शेख यांचा जन्म १९८५ असल्याने हा हिबानामा झाला कसा, असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे. यामागे कोणाचे हितसंबंध दडले आहेत, याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपाबद्दल खा. संदिपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी म्हटले आहे, की अंबादास दानवे यांनी जावेद रसूल शेख हा माझा वाहनचालक आहे हे सिद्ध करावे. एका नावाचे अनेक लोक असू शकतात. या व्यक्तीचा आणि माझा काही एक संबंध नाही. नुसते आरोप करून कसे चालेल. ते सिद्धही करावे लागतील. दानवे यांना आता संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांच्याशिवाय दुसरे काही दिसत नाही का, असा सवालही खा. भुमरे यांनी केला आहे.
काल्डा कॉर्नर येथील ही ३ एकर जमिनीच्या घोटाळ्याचाही आरोप यापूर्वी खा. भुमरे यांचा चालक जावेद शेखवर करण्यात आला आहे. सालारजंगचे वंशज मीर महेमूद अली खान यांनी खा. भुमरेंकडून मोठी रक्कम घेऊन चालक जावेदच्या नावे १५० कोटींच्या जमिनीचा बनावट हिब्बानामा (दानपत्र) करून दिल्याचा आरोप परभणीचे अॅड. मुजाहीद खान यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले होते. ॲड. खान यांचे म्हणणे आहे की खासदाराच्या ड्रायव्हरचा सालार जंग यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही, मग ते मौल्यवान मालमत्ता का देतील? ड्रायव्हर जावेद १३ वर्षांपासून भुमरे पिता-पुत्रांची गाडी चालवत आहे.विशेष म्हणजे, त्या घोटाळ्याच्या चौकशीचे पुढे काय झाले, हे अद्यापही समोर आलेले नाही. हिबानामा कायदेशीररित्या केवळ रक्ताच्या नातेवाईकांमध्येच वैध आहे. सालार जंगचे वंशज आणि ड्रायव्हर केवळ असंबंधित नाहीत तर ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत. सालारजंग घराण्याचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते. हिबानामा म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला कोणताही आर्थिक मोबदला न घेता भेट स्वरुपात देते.

