राखीने पोलीस जबाबात सांगितले, नक्की काय झाले, तेजाने गोळी का झाडली..., दहशत माजवणाऱ्या तेजाची पोलिसांनी शहरातून काढली दुसऱ्यांदा धिंड !

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज ऊर्फ तेजा याची दहशत संपविण्यासाठी शहर पोलिसांनी त्‍याची दुसऱ्यांदा शहरातून धिंड काढली आहे. यापूर्वीही शहर गुन्हे शाखेने एप्रिलमध्ये त्‍याची धिंड काढली होती. तेच चित्र पुन्हा दिसून आले. लंगडत, मान खाली घालून चालणारा तेजा दुसऱ्यांदा नागरिकांनी पाहिला... पण त्‍याची ही शरमेने झुकलेली मान जास्त दिवस राहत नाही, असाही नागरिकांचा अनुभव आहे. दरम्‍यान, तिच्यावर तेजाने गोळी झाडली, त्‍या राखीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सोमवारी (११ ऑगस्ट) रात्री ९ ला काय घडलं, हे विस्ताराने सांगितले आहे...

सर्वप्रथम पोलिसांनी तेजाचे मुंडन केले. त्यानंतर बुढ्ढीलेन, किलेअर्क परिसर व कॅनॉट प्लेसला धिंड काढली. कॅनॉट प्लेसला तर अक्षरश: गुडघ्यावर बसवले.  राखी गणेश मुरमुरे (वय २५, ह. मु. जुनी बिल्डींग स्पाईस ट्री हॉटेलमागे बीड बायपास, मूळ रा. पोस्ट मनाथा, ता. हादगाव, जांभलसावली, जि. नांदेड) हिने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद एजाज याच्यासोबत ४ वर्षांपासून तिचे मैत्रीचे संबंध आहेत. शनिवारी (९ ऑगस्ट) सय्यद फैजल उर्फ तेजा हा राखीला तिच्या घरून त्याच्यासोबत त्याच्या किलेअर्क येथील घरी घेऊन आला होता. तेव्हापासून ती तेथेच राहत होती. सोमवारी (११ ऑगस्ट) राखीने तेजाकडे सिल्व्हर रंगाची पिस्तुल पाहिली. त्यावर तिने त्याला पिस्तुल कुठून आणली, असे विचारले असता त्याने ती तालेब चाऊस याच्याकडून आणल्याचे सांगितले.

रात्री ९ ला तालेब चाऊस त्याच्या आणखी एका मित्रासोबत तेजाच्या घरी आला होता. तालेब चाऊस, तेजा व त्याचा मित्र (नाव पत्ता माहीत नाही) असे तेजाच्या घरी हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेजाच्या हातात पिस्तुल होती. राखीचा मोबाइल तेजाजवळच चार्जिंगला लावलेला होता. तिने त्याला मोबाइल मागितला. तेव्हा त्याने मोबाइल देण्यास नकार देत तिला शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी राखी त्याला वारंवार मोबाइल देण्याची विनंती करत त्याने तिच्यावर पिस्तुल रोखून गोळी मारण्याची धमकी दिली. त्यावर राखी त्याला म्हणाला, की गोली मार के बता... त्यावर त्याने खरोखरच तिच्यावर साधारण ५ फुटांवरून गोळी झाडली.

ती तिच्या उजव्या हाताच्या मनगटाच्या वर लागली. गोळीचा आवाज ऐकून तेजाची आई रेशमा अंजुम सय्यद, काका शेरू चाची नाजो व त्याची बहीण नबिला हे आले. राखीच्या हातातून रक्तस्त्राव होऊन जमिनीवर रक्त सांडले असता तेजाने ते कापडाने पुसून घेतले तेजाच्या आईने तिला रिक्षाने अमान हॉस्पिटल सेंट्रल नाका या ठिकाणी घेऊन गेली. त्या ठिकाणी डॉक्टरांनी हाताचा एक्सरे काढून हातावर पट्टी गुंडाळली. नंतर रिक्षाने पुन्हा तेजाच्या किलेअर्क येथील घरी तिला आणण्यात आले. तेव्हा तिथे तिला पोलीस दिसले. पोलिसांना राखीने लगेच हाताला तेजाने गोळी मारल्याचे सांगितले. तेव्हा तेजाची आई तेथून पळून गेली. पोलिसांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. राखीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेजा, तालेब चाऊस व त्याचा अनोळखी मित्र तसेच तेजाची आई नामे रेशमा अंजुम सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तेजाला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
तेजाविरुद्ध तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात अमली पदार्थांच्या तस्करीसह लुटमार, विनयभंग, हत्येच्या प्रयत्नांचा समावेश आहे. त्‍याला शहर गुन्हे शाखेने सोमवारी (११ ऑगस्ट) रात्री घरातून अटक केली. मंगळवारी (१२ ऑगस्ट) त्याला घटनास्थळी पंचनाम्यासाठी नेले होते. न्यायालयाने त्याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. टीव्ही सेंटर परिसरात रिक्षाचालकामागे कोयता घेऊन धावत दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी तेजाला ५ एप्रिलला अटक केली होती. ११ दिवसांपूर्वी तो हर्सूल कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.

काही महिन्यांपूर्वी राखीला पोलिसांनी केली होती अटक
२५ वर्षीय राखीसुद्धा काही कमी नाही. काही महिन्यांपूर्वी पिस्तुलातून गोळीबार करतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हा सिटी चौक पोलिसांनी तिला अटक केली होती. तिच्या खोलीतून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व तीन चाकू जप्त केले होते. ती तेजासह पुंडलिकनगरमधील एका कुख्यात गुन्हेगाराची मैत्रीण आहे. राखीला गुन्हे जगताचे आकर्षण असून यातून तिला लेडी डॉन व्हायचे स्वप्न पडत असते. राखीचे वडील पोलीस आहेत. नांदेड शहरातील रहिवासी राखी सुशिक्षित कुटुंबातील असून शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती. मात्र, चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारांच्या संपर्कात आली. राखीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software