- Marathi News
- सिटी क्राईम
- लड्डा बंगला दरोडा प्रकरण : सोने रोहिणीकडेच?, हर्सूल तुरुंगातून पोलिसांनी पुन्हा घेतले ताब्यात
लड्डा बंगला दरोडा प्रकरण : सोने रोहिणीकडेच?, हर्सूल तुरुंगातून पोलिसांनी पुन्हा घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील आर.एल. सेक्टरमधील प्लॉट क्र. ९३ मध्ये उद्योगपती संतोष लड्डा यांच्या अलिशान बंगल्यावर सहा शस्त्रधारी दरोडेखोरांनी गेल्या १५ मे रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान धुमाकूळ घालत तब्बल ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. आता या तपासात व्टिस्ट आला आहे. दरोड्यातील बहुतांश सोने एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल बाबूराव खोतकर (वय ३४, रा. आर्च आंगण, पडेगाव) याची बहीण रोहिणी बाबूराव - खोतकर (वय ३५, रा. पडेगाव) हिनेच लपवले असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे शहर गुन्हे शाखेने मंगळवारी (१२ ऑगस्ट) तिला हर्सूल कारागृहातून पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तपासाला आता पुन्हा गती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
संतोष लड्डा यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत दिशा ऑटो कॉम्प्स कंपनी आहे. ही कंपनी त्यांनी २००४ मध्ये सुरू केली. पत्नीच्या माहेरकडील तोष्णीवाल कुटुंबाची यात भागीदारी आहे. या कंपनीतून समुद्रात ऑइल व गॅसच्या पाइपलाइनसाठी पार्ट निर्यात केले जातात. लड्डा हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे आहेत. त्यांचा मुलगा क्षितीजने अमेरिकेत इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग विषयात एमएस केल्याने त्याच्या पदवीप्रदान सोहळ्यात सहभागासाठी ७ मे रोजी संतोष लड्डा हे पत्नी, मोठ्या मुलासह अमेरिकेत गेले आहेत. सोहळ्यानंतर पर्यटन करून ते २४ मे रोजी परतणार होते. अमेरिकेला जाताना त्यांनी १९ वर्षांपासून चालक असलेले संजय झळके यांना घराची देखभाल करण्यास सांगितले होते. तळमजल्यावर झळके झोपलेले असताना त्यांना मारहाण करून हात व तोंड बांधून त्यांच्या छातीवर गावठी पिस्तुल रोखून दोन दरोडेखोर झळके यांच्याजवळ थांबले, तर अन्य चौघांनी बेडरूमचे दरवाजे तोडून लुटालूट सुरू केली होती.
या प्रकरणात आतापर्यंत प्रत्यक्ष दरोडा घालणारे योगेश सुभाष हाजबे (वय ३१, रा. वडगाव कोल्हाटी), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन (वय ३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), महेंद्र माधव बिडवे (वय ३८, रा. साजापूर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (वय ४५, रा. अंबाजोगाई), सोहेल जलील शेख (वय २२, रा. अंबाजोगाई) यांना अटक केली, तर धागेदोरे बनून देविदास नाना शिंदे (वय ४५, रा. शिवाजीनगर, वडगाव कोल्हाटी), बाळासाहेब चंद्रकांत इंगोले (वय ४६, रा. सूर्यवंशीनगर, वाळूज महानगर), महेश दादाराव गोराडे (वय २६, रा. वडगाव कोल्हाटी), गणेश गंगाधर गोराडे (वय २२, रा. सिडको वाळूज महानगर), आजिनाथ पुंजाराम जाधव (वय २२, दोघे रा. सिडको वाळूज महानगर), बबिता सुरेश गंगणे (रा. कुत्तर विहीर, अंबाजोगाई, जि. बीड, दरोडेखोर गंगणेची पत्नी), भारत नरहरी कांबळे (रा. मोटेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर, दरोडेखोर गंगणेचा सासरा), सोने शेख सोहेल शेख मुस्तफा (वय २६, रा. अंबेजोगाई), शेख अबुजर ऊर्फ शाहीद (वय २३, रा. अंबेजोगाई), शेख शाहरूख शेख रफिक (वय ३२, रा. नांदेड), सराफा आशिष जयकुमार बाकलीवाल (वय ४२, रा. वजीराबाद, नांदेड), सूर्यकांत श्रीराम मुळे (रा. अंबाजोगाई), रूपेश सुभाष पत्रे (वय २५, रा. मंथन धाब्याच्या बाजूला, मालेगाव रोड, नांदेड), सराफा व्यावसायिक वैभव श्रीपाद मैड (वय २३, रा. अंबिकानगर, रिंगरोड, नांदेड), राजेश श्रीकृष्ण साठे (३०, रा. भटगल्ली, अंबाजोगाई, जि. बीड) हे संशयित समोर आले होते. त्यांनाही अटक केली होती. पैकी बबिता गंगणे, भारत कांबळे, शेख शाहरूख, आशिष बाकलीवाल यांच्यासह एकूण सहा जणांना जामीन मंजूर झाला आहे.