- News
- पॉलिटिक्स
- मोठ मोठे गार केले... राजेंद्र जंजाळ म्हणाले, तसे पोस्टर्स कार्यकर्त्यांचा राग, पालकमंत्र्यांना करायच...
मोठ मोठे गार केले... राजेंद्र जंजाळ म्हणाले, तसे पोस्टर्स कार्यकर्त्यांचा राग, पालकमंत्र्यांना करायचे होते हर्षदांना उपमहापौर, म्हणून मला विरोध!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यातील संघर्षाच्या ठिणग्या आता पुन्हा उडायला सुरुवात झाल्या आहेत. जंजाळ हे उपमहापौरपदी विराजमान होताच त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी महापालिकेसह शहरभर मोठा जल्लोष केला. पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचण्यासाठी ‘आता कसं वाटतंय.. गोड गोड वाटतंय...’ ‘मोठ-मोठे गार केले, गंमत नाही, तू कोणाच्याही नादी लाग रग्गीलच्या नादी नको, लय महागात पडल’ असे पोस्टर्सही झळकवले. यावर आता राजेंद्र जंजाळ यांनी समोर आलेली प्रतिक्रियाही पालकमंत्री शिरसाटांना पुन्हा आव्हान देणारी आहे. पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते. त्यांनी माझ्या उपमहापौरपदाच्या उमेदवारीला विरोध करायला नको होता. जल्लोष माझा नव्हे तर तो कार्यकर्त्यांचा राग होता. त्यांच्या भावनांना मी कुठेतरी वाट मोकळी होऊ दिली, स्पष्टीकरण जंजाळ यांनी दिले.
गटाची नोंदणी अद्याप नाही
मंत्री शिरसाट आणि जंजाळ यांच्यातील वादामुळे शिंदे गटाने विभागीय आयुक्तांकडे अद्याप १३ नगरसेवकांची गट नोंदणीही केली नाही. गट नेत्याच्या नियुक्तीवरून शिरसाट आणि जंजाळांमध्ये आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे आता गटनेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची निवड करतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मंत्री शिरसाट म्हणाले, की १८ फेब्रुवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. माझे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी त्र्यंबक तुपे यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर जंजाळ म्हणाले, की पक्षाने अद्याप गटनेतेपदाचा निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तोच गटनेता होईल.

