- News
- जिल्हा न्यूज
- वैजापूर बाजार समिती सभापती रामहरी जाधव पायउतार, १३ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव मंजूर, आ. बोरनारे-...
वैजापूर बाजार समिती सभापती रामहरी जाधव पायउतार, १३ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव मंजूर, आ. बोरनारे- डॉ. परदेशी यांच्यातील संघर्ष पेटणार!
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास ठराव बुधवारी (११ फेब्रुवारी) १३ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. जाधव हे सभापतिपदावरून पायउतार होणे शिंदे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
२९ एप्रिल २०२३ रोजी भाजप- शिंदे गटाने एकत्र येऊन बाजार समितीवर सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. जिल्हा परिषद निवडणुकीतही हे पक्ष आमनेसामने ठाकले. वाकला जिल्हा परिषद गटातून सभापती रामहरी जाधव यांच्या पत्नी पार्वताबाई जाधव या शिंदे गटाच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात भाजपच्या अधिकृत उमेदवार आणि बाजार समितीच्या उपसभापती शिवकन्या मधुकर पवार रिंगणात होत्या. या ठिकाणी भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.
संचालक गणेश इंगळे यांना शिंदे गटाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती. त्यामुळे तेही नाराज होते. त्यांनी व प्रशांत त्रिभुवन यांनी शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गणेश इंगळे यांच्या पत्नी प्रिती इंगळे या सवंदगाव गटातून भाजप पुरस्कृत उमेदवार होत्या. मात्र त्यांचा शिंदे गटाच्या नीताताई राजपूत यांनी पराभव केला. मात्र इकडे इंगळे आणि त्रिभुवन यांच्या पक्षांतरामुळे बाजार समितीत भाजपचे संख्याबळ वाढले. सोबतच आ. रमेश बोरनारे आणि नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यातील राजकीय संघर्षाला धार आली आहे. पुढे हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे. आता नवे सभापती म्हणून कुणाकडे मान जातो, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.

