BIG STORY : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची क्रेझ संपणार?; इस्लाम पक्ष ठरणार सक्षम पर्याय!; नाराज गटाचा ओढा, जलील काय म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मकसूद शेख : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मालेगावमध्ये दीड वर्षापूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम पक्षाने (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र) आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार एंट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमची क्रेझ इस्लाम पक्ष संपवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मालेगाव महापालिकेत इस्लाम पक्षाने सत्ता स्‍थापन केल्यानंतर राज्‍यभर या पक्षाची चर्चा होत आहे. स्थानिक मुस्लिमांचा पक्ष म्हणून ‘इस्लाम’ जोरदारपणे समोर येत आहे. त्यामुळे साहाजिकच एमआयएमला सक्षम पर्याय म्हणून या पक्षाकडे पाहिले जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयएमने डावललेली मंडळी आता इस्लाम पक्षाला शहरात वाढविण्याचा प्रयत्‍न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्‍यादृष्टीने त्‍यांच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.

अल्पावधीत इस्लाम पक्ष ज्‍या झपाट्याने राज्‍यभर पाय रोवण्याचे प्रयत्‍न करत आहे आणि मुस्लिम बांधवांचाही या पक्षाला प्रतिसाद मिळत आहे, ते पाहून एमआयएमला धडकी भरणे साहाजिक आहे. पहिल्यांदाच २०२६ मध्ये मालेगाव महापालिका निवडणूक लढवून ३५ उमेदवार या पक्षाचे निवडून आले, सत्ताही स्थापन केली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये एमआयएमची क्रेझ आहे. २०१५ मध्ये एमआयएमने पहिल्यांदा मनपा निवडणूक लढवून २४ उमेदवार निवडून आणले होते. २०२६ च्या निवडणुकीत ३३ नगरसेवक विजयी झाले आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने अनेक निष्ठावंतांना डावलले. त्यामुळे निवडणुकीदरम्यान एमआयएमला मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला होता.

तरीही भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकून एमआयएमने स्वतःला सिद्ध केले. याचे कारण एमआयएमला सक्षम पर्याय मुस्लिम बांधवांना दिसला नाही, असेही म्हटले जाते. हाच पर्याय आता इस्लाम पक्षाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना मिळणार आहे. महापालिका निवडणुकीत पराभूत काही मुस्लीम उमेदवार व माजी नगरसेवक यासाठी प्रयत्‍नशील आहेत. ते गेल्या १५ फेब्रुवारीला १५० वाहनांसह मालेगावला गेले होते. तेथे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांच्यासह पक्षाचे प्रमुख माजी आमदार शेख आसीफ यांना भेटले. याद्वारे शक्तीप्रदर्शन करत शेख आसीफ यांना शहरात येण्याचे निमंत्रणही दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्लाम पक्षाचे आगमन रमजाननंतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे पक्षाला स्थिर करण्यासाठी आणि जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी इस्लाम पक्षाला दीर्घ वेळ मिळाला आहे.

कोण आहेत शेख आसिफ, ज्यांनी दिलाय एमआयएमला सक्षम पर्याय
शेख आसिफ शेख राशिद यांचा जन्म मालेगावमध्ये झाला असून, ते मालेगाव महापालिकेचे महापौरही होते. त्यांनी २०१४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि आमदार झाले. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाले. शेख आसिफ यांनी २०२२ मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी इस्लाम पक्ष स्थापन केला.

या पक्षाचे उद्दिष्ट सेक्युलर धोरणे, सर्वसमावेशक प्रतिनिधित्व आणि स्थानिक विकासावर लक्ष केंद्रित करणे आहे. पक्षाच्या नावावर विवादसुद्धा झाले. मात्र शेख आसिफ यांनी स्पष्ट केले, की त्यांचे लक्ष धर्माच्या नावाखाली नसून, नागरिकांच्या समन्वय आणि विकासावर आहे. १५ जानेवारी २०२६ मध्ये त्यांच्या पक्षाने मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरून ८४ पैकी ३५ जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

जलील काय म्हणाले...
दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना इस्लाम पक्षाच्या छत्रपती संभाजीनगरातील आगमनाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, की लोकशाहीत कोणत्याही पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे. ते येत असतील तर स्वागतच आहे. एमआयएमवर मुस्लिम मतांचा बाजार करणारा पक्ष म्हणून होत असलेल्या आरोपाबद्दल जलील म्हणाले, की राजकारणात आरोप होतच राहतात. आरोप कुणी कुणावरही करू शकतो. पुरावे असेल, तथ्य असेल तर लोक स्वीकारतही. मात्र आमच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असल्याने लोकांनी ते स्वीकारले नाहीत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले.

आम्ही जसे इतक्या दीर्घकाळाच्या संघर्षानंतर वाढलो, तसे इस्लामही वाढत आहे, त्यांचे स्वागतच आहे. लोकशाहीत हा अधिकार प्रत्‍येकाला आहे. मुळात एमआयएम हा पक्ष सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे इस्लाम पक्षामुळे मुस्लिम मतांचे धुव्रीकरण होईल, असे म्हणणेच चुकीचे आहे. जो चांगले काम करेल, त्याला लोक स्वीकारतील. मालेगावमध्ये एमआयएमऐवजी इस्लाम पक्षाला लोकांनी का साथ दिली, याचे विश्लेषण आम्ही केले आहे. आमच्यातील काही नाराज मंडळी इस्लाम पक्षात जात आहे. हा त्यांचा विषय आहे, त्यांना आम्ही बऱ्यापैकी समजावले होते, पण त्यांना जायचेच आहे, तर अडवणार नाही. लोकशाहीत हे पक्षांतर चालतंच असतं, असे जलील म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Latest News

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...
पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!
भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार
शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software