- News
- जिल्हा न्यूज
- CCTV कॅमेऱ्याने सारंच टिपलं! : शिक्षकच देत होते कॉपी, अनेक विद्यार्थी एकाच बाकड्यावर... जैतापूरच्या
CCTV कॅमेऱ्याने सारंच टिपलं! : शिक्षकच देत होते कॉपी, अनेक विद्यार्थी एकाच बाकड्यावर... जैतापूरच्या १२ वी परीक्षा केंद्रावरील प्रकार पाहून पथक चक्रावले!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत पर्यवेक्षकांसह इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थीना इंग्रजीच्या पेपरसाठी प्रश्नांची उत्तरे पुरवली. अनेक विद्यार्थी एकाच बाकड्यावर बसून सामूहिक उत्तरे लिहीत होते. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचे पथक आल्यानंतर त्यांची एकच तारांबळ उडाली. पथकाने हा सर्व प्रकार पाहून डोक्यावर हात मारून घेतला. त्यांना एकसारखी उत्तरे असणारे ९ कागद सापडले. सर्वच वर्गातील सीसीटीव्हींची तापसणी केल्यानंतर पथक भोवळ येऊन पडायचे बाकी राहिले. हा धक्कादायक गैरप्रकार कन्नड तालुक्यातील जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्रात समोर आला.
फूटेज तपासले असता शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीचे कागद देताना आढळले. विद्यार्थी एकमेकांच्या बेंचवर उठून बसत कॉपी करत असल्याचेही दिसले. या केंद्रावर एकूण १९ शिक्षक व कर्मचारी नियुक्त होते. त्यापैकी दोन शिक्षक जिल्हा परिषदेचे असून, त्यांच्या निलंबनाचा निर्णचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सीईओंनी घेतला आहे. इतर १७ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश संबंधित संस्थाचालकाला देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. या १९ शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश कन्नडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी कन्नड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आता या केंद्रावर संपूर्ण कर्मचारीच नव्याने देण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका विशेष तपासणी करण्यासाठी विभागीय मंडळांकडे पाठविल्या जाणार आहेत.

