- News
- जिल्हा न्यूज
- फुलंब्रीत ‘मशाल’ पेटली !; भाजप हरली, सुहास शिरसाट यांच्या पराभवाचे कारण काय...
फुलंब्रीत ‘मशाल’ पेटली !; भाजप हरली, सुहास शिरसाट यांच्या पराभवाचे कारण काय...
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी भाजप उमेदवार सुहास सिरसाट यांचा तब्बल १,७९७ मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत सिरसाट यांनी अवघ्या १९० मतांनी विजय मिळवला होता. यंदा मोठ्या फरकाने ते हरले.
मंगळवारी सकाळी दहाला प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होऊन अवघ्या बारा मिनिटांत पहिली फेरी जाहीर करण्यात आली. त्यानंतरच्या सलग तीन फेऱ्यांनी निकालाचे चित्र स्पष्ट झाले. ठोंबरे यांना एकूण ८,२१७ मते, तर सिरसाट यांना ६,४१७ मते मिळाली. महाविकास आघाडीने बारा नगरसेवक पदे काबीज केली, तर भाजपचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचे ४, ठाकरे गटाचे ७ तर शरद पवार गटाचा १ नगरसेवक निवडून आला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि विजयी नगरसेवकांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर गुलाबी व हिरव्या रंगाचा गुलाल उडाला.
भाजपचे प्रयत्न निष्फळ...
फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने अनेक खेळ्या केल्या. मात्र त्या सर्व अंगलट आल्या. यात सर्वांत मोठी खेळी होती, ती शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी उमेदवारी मागे घेतली आणि लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे शिंदे गटाची नाराजी नाहक शिरसाट यांना सहन करावी लागली. ढोके राहिले असते नसते तरी भाजपला फारसा पडणार नव्हता. काटशहाचे राजकारणाचे शिरसाट बळी ठरले असे आता म्हटले जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र कट्टर कार्यकर्ता राजेंद्र ठोंबरे यांना मैदानात उतरवले होते. भाजपचे तोडफोडीचे राजकारण मतदारांना रूचले नाही. शिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत सुहास शिरसाट हे आमदारकीचे तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत होते. भविष्यात ते डोईजड ठरतील, यामुळेही त्यांचा पराभव घडवून आणण्यासाठी भाजपमधीलच एक गट कार्यरत होता, असे आता बोलले जात आहे.

