छत्रपती संभाजीनगरमध्ये नवा वाद पेटला : हातगाड्यांविरुद्ध आता व्यापारी आक्रमक, मार्केट बंद ठेवण्याचा इशारा!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहागंज भागातील मुजोर हातगाडीवाल्यांच्या विरोधात आता व्यापारीच एकवटले आहेत. बाजारपेठेतील हातगाड्या २ दिवसांत हटवा, अन्यथा तिसऱ्या दिवसापासून गांधी पुतळा ते सिटी चौक सर्व मार्केट बंद दिसेल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद आता राजकीय स्तरावरून व्यावसायिक पातळीवर आला आहे.

गुरुवारी (५ मार्च) व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी, नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल, नगरसेवक सचिन खैरे, सुनील अग्रवाल आदींची उपस्थिती होती. हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीसह मंगळसूत्र चोरी आणि वादाचे प्रकार वारंवार घडत असून, रस्त्यावरील हातगाड्या हटवून त्यांना स्वतंत्र जागा द्या, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी पोलीस व महापालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे व्यापारी ६ मार्चला बाजारपेठ बंद ठेवणार होते. मात्र महापौर समीर राजूरकर यांनी व्यापाऱ्यांशी फोनवर चर्चा करून आणखी २ दिवसांची मुदत मागितली. त्यांना व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली.

त्यामुळे आता प्रशासनावर शहागंज ते सिटी चौक भागातील हातगाडीवाल्यांविरुद्ध आक्रमक मोहीम हाती घेण्यासाठी दबाव वाढला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांवर यापूर्वीच महापालिकेच्या पथकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईसुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे ते कारवाईला विरोध करण्याच्या भानगडीत पडतील का, असा प्रश्न आहे. शहागंजमध्ये मुजोर हातगाडीवाल्यांनी गर्भवती महिला व तिच्या पतीला मारहाण केल्यामुळे हा विषय ऐरणीवर आलेला आहे. यापूर्वी शहरात १९८८ मध्ये दंगल झाली होती, त्यावेळीही रस्त्यावरील हातगाड्या हटवून त्यांना आमखास मैदान आणि निजामुद्दीन दर्गा रोडची जागा देण्यात आली होती. त्यानंतर हातगाडीवाले उच्च न्यायालयात गेले, २००५ मध्ये रस्ता बंद होईल अशा प्रकारे हातगाड्या लावू नयेत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर मात्र न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष झाले, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी म्हटले आहे.

एमआयएमच्या १० नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई सुरू
शहागंजमध्ये अतिक्रमण हटाव पथकाला पिटाळून लावत एमआयएमच्या नगरसेवकांनी हातगाड्या लावायला लावल्या. या प्रकरणात दहा नगरसेवक, चार नगरसेविकांच्या नातेवाइकांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्या नगरसेवकांवर आता अपात्रतेची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली. ज्या नगरसेविकांचे पती, नातेवाइक उपस्थित होते, त्यांच्यावरही कारवाईसाठी अभ्यास सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडीओ आणि रील्स आता या नगरसेवकांच्या विरोधात पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत. अनेक नगरसेवकांनी आपण तेथे नव्हतो, असा दावा केला असला तरी, आयुक्तांनी तो फेटाळून लावला असून, काही नगरसेवकांनी तेथे हस्तक्षेप करतानाचे व्हिडिओ स्वतःहून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. काही नगरसेवकांनी अतिक्रमणे केल्याच्या तक्रारी आहे. त्यानुसार सर्वेक्षण करायला लावत स्थळ पाहणी अहवाल मागवले होते. हा अहवालही प्राप्त झाला आहे. पुढील काही दिवसांत यावरही अभ्यास करण्यात येणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते अब्दुल समीर यांनी टीका केली असून, कोणताही पुरावा प्रशासनाकडे नसून, निव्वळ भाजप, शिंदेसेनेच्या दबावाखाली कारवाई होत आहे. या कारवाईच्या विरोधात गरज पडली तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे ते म्हणाले.

महापालिकेकडून हातगाड्यांचे सर्वेक्षण सुरू
महापालिकेने आता शहरातील हातगाड्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची महत्त्वाची बैठक पार पडली. महापालिका शहरातील हातगाड्यांचे सर्वेक्षण करणार असून, कोणत्या रस्त्यावर किती हातगाड्या लागतात आणि त्यांना थांबण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहेत का, याचा शोध घेतला जाणार आहे. सर्वेक्षणानंतर शहरात हॉकर्स झोन कुठे निश्चित केले जाणार आहेत, याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आजवर महापालिकेने शहागंजमध्ये ५८ हातगाड्या जप्त केल्या असून, ८५ अनधिकृत शेड जमीनदोस्त केले आहेत. १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, शहरात नागरी उपजीविका अभियानांतर्गत सुमारे १४ हजार पथविक्रेत्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यांचे या मोहिमेत काय होणार, याकडेही महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

मुकुंदवाडीत हातगाड्यांवर कारवाई
मनपाने शहरातील विविध भागांतील हातगाड्यांवरही कारवाई करायला सुरुवात केली आहे. गुरुवारी (५ मार्च) मुकुंदवाडीत रस्त्यावर उभ्या हातगाड्यांवर कारवाई केली. यात २७ हातगाड्या, ११ काउंटर, ६ टपऱ्या जप्त करण्यात आल्या. मुकुंदवाडी गावात जाणाऱ्या कमानीपासून भाजी मंडईपर्यंत नेहमीच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हातगाड्या लावलेल्या असतात. यामुळे वाहतूक कोंडी होत असते. वारंवार रस्ते अडवणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारीही महापालिकेने केली आहे. शहरातील सर्वच भागांत कारवाई सुरू राहणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software