- News
- पॉलिटिक्स
- वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संत...
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाणीप्रश्नावरून ठाकरे गटाने छेडलेल्या आंदोलनाला आज, ६ एप्रिलला सकाळी साडेदहाच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील खवडा डोंगर भागात (धुळे-सोलापूर महामार्ग) हिंसक वळण लागले. परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलन होऊच दिले नाही. गटागटाने येणाऱ्या नागरिकांना अडवून ताब्यात घेतले. आंदोलनाचे नेते सुरेश सोनवणे यांना अक्षरशः धक्काबुक्की करत पोलिसांच्या गाडीत बसवले. दत्तात्रय वरपे, जिल्हा परिषद सदस्या ललिता सोनवणे यांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी मडके थेट पोलिसांच्या अंगावर फोडायला सुरुवात केली. यात एक मडके पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या पायावर पडल्याने ते जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली.
आंदोलन का चिघळले?
ठाकरे गटाने आंदोलनाची बरीच हवा निर्माण केली होती. त्यामुळे आंदोलन व्यापक प्रमाणावर होणार हे निश्चित होते. आंदोलनाला पोलिसांची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांनी सकाळपासून मोठा बंदोबस्त तैनात केला होता. स्वतः पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे हजर होते. आंदोलनस्थळी नागरिक जमायला सुरुवात झाली, तसे पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. गटा गटाने येणाऱ्या नागरिकांना अडवायला सुरुवात केली.

आंदोलनाला परवानगी नाही, त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेऊनही आंदोलनकर्ते ऐकत नसल्याने गाडे यांनी सुरेश सोनवणे यांना ताब्यात घेताना तर अक्षरशः बळाचा वापर केला. ढकलतच त्यांना पोलीस गाडीत बसवले. दत्तात्रय वरपे आणि ललिता सोनवणे यांनाही ताब्यात घेतल्याने आक्रमक महिला, पुरुषांनी मडके पोलिसांवर फेकायला सुरुवात केली.
सिडकोच्या सहायक वसाहत अधिकारी स्वाती पाटील या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला आंदोलनस्थळी आल्या. मात्र पोलिसांनी त्यांची भेटच घडू दिली नसल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी सुरेश सोनवणे, दत्तात्रय वरपे आणि ललिता सोनवणे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हजार-दीड हजार लोकांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

