छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील मछली खडक भागात मंगळवारी (३ मार्च) दुपारी समोर आली. या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुरुवारी (५ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.
व्यापारी मनोज मंगेश बोंबले (वय ३४, रा. मछली खडक) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई, वडील, पत्नी व मुलासह राहतात. त्यांचे मंगेश कलेक्शन हे दुकान आहे. २६ फेब्रुवारीला त्यांच्या नातेवाइकाकडे लग्न समारंभ होता. त्यामुळे बोंबले यांच्या घरीही खूप सारे नातेवाइक आलेले होते. त्यांच्या घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवलेले होते. लग्नाचा कार्यक्रम असल्याने बऱ्याच वेळा कपाट उघडणे व लावणे होत होते. नातेवाइक निखील राजेंद्र टिकार याच्यासमोर कपाटाची चावी धान्याच्या डब्यात ठेवून सर्वजण दुपारी १ ला गारखेडा परिसरातील मोदक हॉटेलमध्ये सर्व जण गेले. त्यानंतर निखील टिकार (रा. धनकवडी, पुणे) हा त्याच्या पत्नीस ऊन लागून उलट्या होत असल्याने बोंबले यांच्या वडिलांकडे दुपारी अडीचला आला व म्हणाला, की तुमच्या घराची चावी द्या.
मी माझ्या पत्नीस आराम करण्यासाठी घेऊन जात आहे. त्यामुळे वडिलांनी घराची चावी समोरील दुकान अमर किड्स अँन्ड रेडिमेड याच्याकडे ठेवलेली आहे. ती घेऊन घरात आराम करा, असे सांगितले. त्यानंतर निखील व त्याची पत्नी वर्षा हे बोंबले यांच्या घरी गेले. घरात आराम करून दुपारी साडेचारला अमर किड्स अॅन्ड रेडीमेड यांच्याकडे घराची चावी देऊन परत लग्नाच्या ठिकाणी मोदक हॉटेल येथे आले. सर्वजण लग्न समारंभ उरकून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परतले. ३ मार्च २०२६ रोजी दुपारी बोंबले यांच्या आजीचे ऑपरेशन झालेले असल्याने त्यांच्या गळ्यातील पोत घरी ठेवलेली असल्याने ती आजीला देण्यासाठी बोंबले यांच्या आईने कपाट उघडून बघितले असता आजीची पोत मिळून आली नाही.
घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने तपासले असता ते सुद्धा मिळून आले नाहीत यात ७ लाखांचे १०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, ७० हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५० हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची पोत, ३० हजार रुपयांचे सोन्यातील कानातील वेल, ५० हजार रुपयांचा ३०० ग्रॅमचा चांदीचा तुकडा, ७ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे टॉप्स असे एकूण ९ लाख ७ हजार दागिने चोरीला गेलेले होते. बोंबले यांनी निखिल व त्याची पत्नी वर्षा यांच्यावर संशय व्यक्त केला असून, त्यांनीच ते चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड करत आहेत.