- Marathi News
- जिल्हा न्यूज
- जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
.jpg)
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : गोदावरी खोरे हे सर्वात मोठे खोरे असून समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोऱ्यात आणण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण सगळे मिळून हे काम करू आणि गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम करू, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज, ३१ जुलैला पैठण येथे केले. धरणाचे १८ दरवाजे ०.५ फूट उचलून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू करण्यात आला आहे. पुढील काही तासांत विसर्गाचे प्रमाण वाढवला जाण्याची शक्यता आहे.
.jpg)
बालपणीच्या आठवणीत रमले मंत्री विखे पाटील...
आठवणींना उजाळा देत विखे पाटील म्हणाले, की मी या प्रकल्पाचा लहानपणापासून साक्षीदार आहे. येथून जवळ असलेले खिर्डी हे माझ्या बहिणीचं गाव. तो पाण्यासाठीचा संघर्षाचा काळ होता. मी लहान होतो. बहिणीकडे इथं पैठणला मी येत असे. आमच्या आजोबांचा अमृत महोत्सवी सत्कार याच धरणावर स्व. इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाला होता. मी कृषी महाविद्यालयात शिकत असताना सायकलीवर धुळ्याहून इथं संत ज्ञानेश्वर उद्यान येथे आलो होतो, अशीही आठवण विखे पाटील यांनी सांगितली.
जलसाठा आणि विसर्ग
सध्या धरणात ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी १५२०.१८ फूट आहे. धरणाचा एकूण जलसाठा २६९४.७७६ दलघमी असून १९५६.६७ दलघमी जिवंत साठा आहे. धरणाच्या विसर्ग नियमावलीनुसार सध्या १८ दरवाजे अर्धाफूट उघडून ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सद्यस्थितीत धरणात १६२३० क्युसेक इतकी पाण्याची आवक आहे. सध्या धरण तुडूंब भरले असून दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या छोट्या मोठ्या धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून होत असलेल्या पाणी विसर्गामुळे नदीच्या काठावरील गावांमध्ये नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आक्रमक होऊन शेतकऱ्यांची घोषणाबाजी
पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांकडे थकीत असलेले ऊसाचे पैसे तात्काळ मिळावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी केली. विखे यांना मागण्यांचे निवेदन दिले.