वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या, ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी वाळूज परिसरात प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. एमआयडीसी वाळूज व वाळूज या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ८ जिल्हा परिषद गट आणि १४ पंचायत समिती गणांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून शांततेत व निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठा व संवेदनशील भागांत पोलिसांनी पथसंचलन करीत नागरिकांशी संवाद साधला. मतदान शांततेत पार पडेल, कोणत्याही अफवा अथवा अनुचित प्रकाराला थारा दिला जाणार नाही, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

एमआयडीसी हद्दीत १४९ मतदान केंद्रे
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ जिल्हा परिषद गट व ९ पंचायत समिती गणांचा समावेश आहे. या क्षेत्रातील २२ गावांतील ४२ इमारतींमध्ये एकूण १४९ मतदान केंद्रांवर उदया मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी एका पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ९ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, १७३ कर्मचारी, तसेच ३३ महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राखीव पोलीस दलाची एक तुकडी, ३ स्ट्रायकिंग फोर्स पथके आणि तब्बल १७२ होमगार्ड जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाळूज परिसरात ७४ मतदान केंद्रांवर मतदान 
वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ जिल्हा परिषद गट व ५ पंचायत समिती गणांचा समावेश आहे. या क्षेत्रातील २५ गावांमधील ३५ इमारतींमध्ये एकूण ७४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. येथे ८ पोलीस अधिकारी, २९ पोलीस कर्मचारी व ७० होमगार्ड जवानांचा बंदोबस्त तैनात असून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नियमित गस्त वाढवण्यात आली आहे.

निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन
मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाळूज महानगरातील उद्याचे मतदान हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील निर्णायक लढतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

एमआयडीसी वाळूज व वाळूज ठाण्याहद्दीत २२३ बूथ 
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रांजणगाव, जोगेश्वरी, अंबेलोहळ, वडगाव, बजाजनगर, पंढरपूर, तिसगाव, सिडको वाळूज महानगर आदी २२ गावांमध्ये एकूण १४९ बूथ आहेत. तर वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाळूज, शेंदूरवादा, तुर्काबाद आदी ४० गावात ७४ बूथ आहेत. परिसरात रांजणगाव शेणपूंजी गटात सर्वाधिक ४४ हजार ७८८ मतदार आहेत. तर वडगाव को. (उत्तर पूर्व ) २६ हजार ४८८, वडगाव को. (मध्य पश्चिम ) २० हजार १९५ , पंढरपूर - २४ हजार १४१, दौलताबाद - ३३ हजार ७८०, वाळूज- ३४ हजार ५४९, आंबेलोहळ- ३६ हजार ९६८ असे एकूण या गटांमध्ये २ लाख २० हजार ९०९ मतदार आहेत. उद्या होणाऱ्या मतदानासाठी या भागातील मतदान केंद्रांवर आज दुपारी मतदानाचे साहित्य पोहचले. सायंकाळ पर्यंत परिसरातील सर्वच बुथवर मतदानाची तयारी पुर्ण करण्यात आली होती. मतदान प्रकिया सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी एमआयडीसी वाळूज व वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस अंमलदार, होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software