- News
- सिटी डायरी
- मुजोर हातगाडीवाल्यांच्या दहशतीतून शहागंज मुक्त करण्याची हीच ती वेळ!; गर्भवती महिलेसह तरुणाला अमानुष
मुजोर हातगाडीवाल्यांच्या दहशतीतून शहागंज मुक्त करण्याची हीच ती वेळ!; गर्भवती महिलेसह तरुणाला अमानुष मारहाण केल्याने शहरात संतापाची लाट!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वर्षानुवर्षे शहागंज चमनला मुजोर हातगाडीवाल्यांनी वेढा घातला आहे. ७० टक्के रस्ता व्यापून टाकल्यानंतर वाहनधारकांशी त्यांची अरेरावी नित्याचीच आहे. पोलीस चौकीला कडी लावलेली असते, त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांचे फावते. त्यांच्या मुजोरीचा आणि दहशतीचा नमुना बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी चारच्या सुमारास दिसला. जो इतका धक्कादायक आहे, की शहरभर संतापाची लाट उसळली आहे. मुजोर हातगाडीवाल्यांच्या दहशतीतून शहागंज मुक्त करण्याची हीच ती वेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. मोठ्या अपेक्षेने बहुमताने निवडून आलेल्या भाजपच्या महापौर, शिंदे गटाच्या उपमहापौरांनी आता यासाठी पुढाकार घ्यावा, प्रशासनाला सक्तीने कामाला लावावे, अशी मागणी होत आहे.
शहागंजमध्ये हातगाडीवाल्यांसह रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांची दहशत नित्याचीच आहे. वाहनधारकांना अरेरावी करणे, मारहाण करणे अशा घटना वारंवार घडत असताना त्याला अंकुश लावण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी एकत्र येऊन तातडीने मोठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. आता महापालिका प्रशासन हे पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन हातगाड्या आणि अतिक्रमणधारकांवर कारवाईची दिशा ठरवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, एमआयएमला या मुजोर हातगाडीवाल्यांचा पुळका आला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते अब्दुल समीर म्हणाले, की हातगाड्या व अतिक्रमणांवर कारवाईसाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र रमजान महिना सुरू असल्याने कारवाई करू नये. त्यानंतर होणाऱ्या कारवाईला आमचा पाठिंबा असेल.
-दाम्पत्याला केलेल्या मारहाण प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे.
अब्दुल समीर यांची पथकाला अरेरावी...
महापालिकेत ३३ नगरसेवकांचे बळ घेऊन बसलेल्या एमआयएमचा मुजोर हातगाडीवाल्यांना सरळ सरळ पाठिंबा असल्याचेच दिसून येत आहे. महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक मंगळवारी दुपारी शहागंजमध्ये कारवाईसाठी गेले असता विरोधी पक्षनेते अब्दुल समीर यांनी या पथकाला अरेरावी केली व माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर या मुजोर हातगाडीवाल्यांनी समीर यांचा सत्कार केल्याचे सांगण्यात येते.

