- News
- सिटी क्राईम
- भुमरे X दानवे वाद पेटला!; दानवेंच्या आरोपावर भुमरेंचा पलटवार, म्हणाले, मानसिक संतुलन बिघडल्यानेच बिन...
भुमरे X दानवे वाद पेटला!; दानवेंच्या आरोपावर भुमरेंचा पलटवार, म्हणाले, मानसिक संतुलन बिघडल्यानेच बिनबुडाचे आरोप, कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आमदार नाहीत, की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही राहिलेले नाहीत. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठीच त्यांनी खा. संदिपान भुमरे यांना घोटाळ्याच्या आरोपात ओढण्याचा प्रयत्न केला की काय, असा प्रश्न निर्माण व्हावा, असे चित्र आता समोर येत आहे. दानवे यांनी खा. संदीपान भुमरे व त्यांचा वाहनचालक जावेद यांच्यावर ११५० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप मंगळवारी (२४ फेब्रुवारी) केला होता. बुधवारी (२५ फेब्रुवारी) दिल्लीचा दौरा रद्द करून खा. संदिपान भुमरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दानवेंच्या आरोपातील हवाच काढून टाकली. दानवे यांनी उल्लेख केलेला गटच अस्तित्वात नसून, त्या वादग्रस्त गटातील भूसंपादनाचा मोबदला कोर्टात जमा आहे. दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. दानवे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितल्याने हा वाद आता चांगलाच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.
-जावेद माझा वाहनचालक असल्याचे मी नाकारत नाही. मात्र दानवे यांनी माहिती घेऊन आरोप करायला हवे होते.
-जिल्हा हातातून गेला, आता आमदारही राहिले नाहीत. विरोधी पक्षनेत्याच्या लवाजम्याची सवय होती. तीही गेली. आता त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे संतुलन बिघडून दानवे खोटे बोलत आहेत.
-जमिनीशी निगडीत ती महिला कोण आहे, तिला मी किंवा माझा चालक ओळखतही नाही.
-माझ्या चालकाची जन्मतारीख १९८४ आहे आणि हिबानामा १९७१ मध्ये झाला आहे. त्यावेळी जावेद जगातही आला नव्हता.
-ती बाई हिंदू आहे. जमीन मुस्लीम व्यक्तीची असल्याने हिबानामा (बक्षीसपत्र) होत नाही. शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाला असेल, तर प्रकरणाची चौकशी व्हावी.
-दानवे यांनी केलेल्या आरोपांचे पुराव्यानिशी उत्तर द्यावे. दानवे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
-११५० कोटी हा भाव कोणी काढला, हेही दानवेंनी स्पष्ट करावे. यापूर्वीही आ. विलास भुमरे यांना मारहाण झाल्याचा खोटा आरोप दानवेंनी केला होता. त्याप्रकरणीही अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. त्याची सुनावणी २७ फेब्रुवारीला आहे. आता याही बाबतीत त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार.
-माझ्या चालकाने चुकीचे केले असेल, तर त्याच्यावरही कारवाई करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीदेखील माझी मागणी आहे.
-१७४ हा गट क्रमांकच नाही. १५४ गटाचे वाद सुरू आहेत, त्याचा मोबदला (पैसे) कोर्टात जमा आहे. गट फक्त १७१ पर्यंतच आहेत. मग हिबानामा कसा होऊ शकतो? ज्या १५४ गटाचे कोर्टात वाद आहेत, ते लोक वेगळे आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन लता सूर्यभान वाघामारे यांचे खापर पंजोबा दिवंगत पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात २३ एकर ३० गुंठे जमीन होती. ते या जमिनीचे प्रतिबंधित मालक होते. हैदराबाद संस्थानात ती त्यांना बहाल करण्यात आली होती. १९५७ मध्ये प्रमाणपत्राच्या आधारे बहाल केलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर पडीक होती. ही जमीन पुढे महाराष्ट्र विकास मंडळास संपादीत करून देण्यात आली होती. समृद्धी महामार्गासाठी ही जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश झाल्यानंतर त्याचे बाजारमूल्य ११५० कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले. यातील तीन एकर जमीन कुळ कायद्याने जावेद रसूल शेख यास हिबानामा करून देण्यात आली. ज्याची किंमत १५० कोटी रुपये आहे. जावेद शेख हे खा. भुमरे यांचे वाहनचालक आहेत. १९७१ मध्ये हिबानामा केला आहे. मात्र शेख यांचा जन्म १९८५ असल्याने हा हिबानामा झाला कसा, असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित करून, यामागे कोणाचे हितसंबंध दडले आहेत, याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल प्रशासनाकडे केली आहे. हैदराबाद कुळ कायद्यानुसार जमीन हस्तांतरण होण्याची बंदी असताना तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसील मंडळ व भूसंपादन अधिकारी यांनी जमीन हडप करण्यासाठी केलेल्या या प्रकाराची चौकशी करावी. २३ एकर कुळ कायद्याची जमीन हस्तांतरीत कशी झाली, शासनाचे कोट्यवधी रुपये खिशात घालण्यासाठी जावेद शेख यांच्या पाठशी कोण आहेत, याची चौकशी करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे.
काल्डा कॉर्नर येथील ही ३ एकर जमिनीच्या घोटाळ्याचाही आरोप यापूर्वी खा. भुमरे यांचा चालक जावेद शेखवर करण्यात आला आहे. सालारजंगचे वंशज मीर महेमूद अली खान यांनी खा. भुमरेंकडून मोठी रक्कम घेऊन चालक जावेदच्या नावे १५० कोटींच्या जमिनीचा बनावट हिब्बानामा (दानपत्र) करून दिल्याचा आरोप परभणीचे ॲड. मुजाहीद खान यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले होते. ॲड. खान यांचे म्हणणे आहे की खासदाराच्या ड्रायव्हरचा सालार जंग यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही, मग ते मौल्यवान मालमत्ता का देतील? ड्रायव्हर जावेद १३ वर्षांपासून भुमरे पिता-पुत्रांची गाडी चालवत आहे.विशेष म्हणजे, त्या घोटाळ्याच्या चौकशीचे पुढे काय झाले, हे अद्यापही समोर आलेले नाही. हिबानामा कायदेशीररित्या केवळ रक्ताच्या नातेवाईकांमध्येच वैध आहे. सालार जंगचे वंशज आणि ड्रायव्हर केवळ असंबंधित नाहीत तर ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत. सालारजंग घराण्याचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते. हिबानामा म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला कोणताही आर्थिक मोबदला न घेता भेट स्वरुपात देते.

