- News
- सिटी डायरी
- महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दीर्घकाळानंतर महापालिकेचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती आला आहे. इतक्या वर्षांत प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हम करे सो कायदा, असाच रवय्या अवलंबला. नेतेमंडळीही हातचे राखूनच त्यांच्याशी गोड बोलून काम करून घेत होते. आता हातात सत्ता आल्यानंतर ही नेतेमंडळी पदाचा वापर करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामांसाठी धारेवर धरत असल्याने अधिकारी-कर्मचारी कावरेबावरे झाल्याचे चित्र आहे. कॉल केल्यावर मग्रूर भाषा ऐकताच नेत्यांचा पारा चढतो, त्यावेळी आम्हाला नगरसेवक, त्यांचे नातेवाईक शिवीगाळ गाळतात, असा आरोप अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. महापालिका आयुक्तांनी यावर पुन्हा नगरसेवकांना धमकी दिली असून, यापुढे कोणीही शिवीगाळ केली, दाराला लाथ मारून कार्यालयात प्रवेश केला तर त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, असा प्रकार कधी आणि कोणत्या नगरसेवकाबद्दल झाला, याची माहिती मात्र पुराव्यानिशी आयुक्तांनी दिलेली नाही. त्यामुळे एकप्रकारे सर्वच नगरसेवकांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याची टीका होत आहे.
दीर्घ काळात महापालिकेत प्रशासक राज असल्याने समस्या सोडविण्यात अधिकारी, कर्मवारी दिरंगाई, मनमानी करत होते. आता नगरसेवक असल्याने नागरिक थेट त्यांना जाब विचारत आहेत. त्यामुळे नगरसेवकही अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुनावत आहेत. वॉर्ड अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांना प्रामुख्याने नगरसेवकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यात रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा हे चारच मुद्दे प्रामुख्याने आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजाची पद्धतच माहीत नाही. नगरसेविकांचे नवरोबाच काम पाहत आहेत. त्यांनी कामकाजात हस्तक्षेप सुरू केला आहे, असे आरोप अधिकारी, कर्मचारी करत आहेत. या छळाला कंटाळून बदली करून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर, या अधिकाऱ्यांची बाजू घेत आयुक्तांनीही नगरसेवकांना धमकावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, की...
-यापुढे कुणी नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाइक दादागिरी करत असतील तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा.
-नगरसेवकाचा कॉल उचलता आला नाही तर मेसेज करावे. कार्यालयात येणाऱ्या नगरसेवकांचे स्वागत करा. त्यांचे म्हणणे नीट ऐका.
-विकासकाम नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाइकाचे ऐकून थांबविले तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.
-लेटरहेडवर कोणी औरंगाबाद, कोणी संभाजीनगर तर कोणी छत्रपती संभाजीनगर असे लिहीत आहे. याबाबत महापौरांसोबत चर्चा करून एकसारखेपणा आणण्यात येईल.

