- Marathi News
- सिटी डायरी
- ‘विद्यादीप’ला पाठिशी घालणाऱ्या बाल कल्याण समितीला नोटीस!; सिस्टर अर्चनाची हकालपट्टी!!, ९ मुलींच्या प...
‘विद्यादीप’ला पाठिशी घालणाऱ्या बाल कल्याण समितीला नोटीस!; सिस्टर अर्चनाची हकालपट्टी!!, ९ मुलींच्या पलायनाच्या चौकशीसाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छावणीतील विद्यादीप बालगृहातून ९ मुलींनी आक्रमक होत जिवावर उदार होऊन पलायन केले होते. शासनाने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, विद्यादीप संस्थेसह बाल कल्याण समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी बालविकास उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. समितीचा अहवाल सात दिवसांत येणार असून त्यानंतर कार्यवाही […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छावणीतील विद्यादीप बालगृहातून ९ मुलींनी आक्रमक होत जिवावर उदार होऊन पलायन केले होते. शासनाने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, विद्यादीप संस्थेसह बाल कल्याण समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी बालविकास उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. समितीचा अहवाल सात दिवसांत येणार असून त्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी (२ जुलै) विधान परिषदेत स्पष्ट केले.
बाल सुधारगृहातील अल्पवयीन मुलींच्या छळाचे अनेक संतापजनक किस्से समोर येत आहेत. कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, वेळोवेळी केली जाणारी मारहाण, असुविधा यामुळे बालगृहाचे व्यवस्थापन आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या बाल कल्याण समितीबद्दल संतापजनक भावना निर्माण होत आहेत. विद्यादीप बाल सुधारगृहाला संस्थेने अक्षरशः जेलचे स्वरुप दिले आहे. छळाविरुद्ध बोलाल तर बाहेरचे लोक केवळ १५ मिनिटांसाठी येतात, आम्ही कायम आहोत, अशा धमक्या मुलींना दिल्या जायच्या. एका विशिष्ट धर्माचे आचरण करण्यावर मुलींवर जबरदस्ती केले जायचे, असेही समोर येत आहे.
विद्यादीप बालसुधारगृहात मुलींच्या होत असलेल्या छळाबाबत सकल हिंदू महिला सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. सुधारगृहातील मुलींना न्याय मिळावा, अशी मागणी बुधवारी (२ जुलै) केली. बालसुधारगृहातील परिस्थिती धोकादायक असून, उच्चस्तरीय चौकशी करावी. बालगृहात धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात आहे. जादूटोणा केलेले पाणी प्यायला दिले जात आहे, असे आरोप करतानाच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालकल्याण समिती बरखास्त करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
घटनेची पार्श्वभूमी…
विद्यादीप बालसुधारगृहातून एकाचवेळी ९ अल्पवयीन मुलींनी ३० जूनला सकाळी साडेअकराच्या सुमारास पलायन केले होते. बालसुधारगृहातील लाइट फोडून हातांवर जखमा करून घेत दगड, चाकू, लोखंडी रॉड हाती घेऊन त्या पळत सुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बालसुधारगृहाच्या निरीक्षकांना ही बाब लक्षात येईपर्यंत त्या बऱ्याच दूरपर्यंत गेल्या. छावणी पोलिसांसह दामिनी पथकाने तातडीने धाव घेऊन मुलींची धरपकड सुरू केली. जिल्हा न्यायालयासमोर ५ मुली तर २ मुली रेल्वेस्थानक परिसरात मिळाल्या. २ मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. त्यातील एक मुलगी स्वतःच्या घरी गेली होती. ती नंतर आईसह बालकल्याण समितीसमोर आली. एक मुलगी अद्यापही सापडलेली नाही.