- Marathi News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC चे API मनोज शिंदे यांची सहकाऱ्यांसह मिळून धडाकेबाज कामगिरी, २ कारवाया अन् अडीच लाखांचा ग...
वाळूज MIDC चे API मनोज शिंदे यांची सहकाऱ्यांसह मिळून धडाकेबाज कामगिरी, २ कारवाया अन् अडीच लाखांचा गुटखा जप्त, एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे धडाकेबाज सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी गुटखा माफियाची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. सहकाऱ्यांसह मिळून त्यांनी दोन ठिकाणी मोठ्या कारवाया करत एकूण अडीच लाखांचा गुटखा जप्त केला असून, एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विटावा फाटा आणि एएस क्लबजवळ या कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
एएस क्लबजवळ सापळा रचून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुटखा माफियाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला गुटखा पुरवणारा आणि त्याच्याकडील दुचाकीच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (२८ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. उमेश शामलाल मालपाने (वय ३३, रा. वावडे चाळ, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक), पुरवठादार जावेद भाई (पूर्ण नाव माहीत नाही, रा. अहिल्यानगर), वाहनमालक जितेंद्र उर्फ बंटी नरेंद्र चांडक (वय ३९) अशी संशयितांची नावे आहेत. उमेशला पोलिसांनी अटक केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शशिकांत कुचेकर (वय ३७, रा. कांचनवाडी, पैठण रोड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.
गुरुवारी (२८ ऑगस्ट) वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी रात्री ११ ला कुचेकर यांना कॉल करून धुळे- सोलापूर हायवेवरील एएस क्लब चौकाच्या अलीकडे लिंबाच्या झाडाखाली कारवाईसाठी यायला सांगितले. त्यानंतर कुचेकर हे सहकाऱ्यांसह रात्री सव्वा अकराला तिथे गेले. संशयित दुचाकी (MH20 BV4693) रात्री ११ वाजून २० मिनिटांनी येताच पोलिसांनी अडवली. दुचाकीचालकाला कुचेकर आणि पोलीस उप निरीक्षक दिनेश बन, अंमलदार संतोष बमनाथ, वैभव गायकवाड यांनी ओळख करून दिली. वाहनचालकाने त्याचे नाव उमेश मालपाने असल्याचे सांगितले. त्याने त्याच्याकडील थैल्यांत चहापत्ती असल्याचे सांगितले. पोलिसांनी झडती घेतली असता ४० हजार रुपयांचा गुटख्याचा साठा आढळला. पोलिसांनी त्याची २० हजारांची दुचाकी आणि १० हजार रुपयांचा मोबाइल जप्त केला.