शस्‍त्रक्रियेनंतर तरुण रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या!, सिडको चौकातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर येथील सह्याद्री आणि सिडकोच्या वसंतराव नाईक चौकातील वैद्यनाथ हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्ण तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी वैद्यनाथ रुग्णालयातच मंगळवारी (१८ नोव्‍हेंबर) सकाळपासून दुपारी २ पर्यंत ६ तास ठिय्या दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. कुटुंबाची समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

स्कूल बसचालक ऋषिकेश उर्फ अजय अनिल गव्हाणे (वय २४, रा. जयभवानीनगर, छत्रपती संभाजीनगर) आईसह जालन्यात राहत होता.  काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, आईला तो एकुलता एक मुलगा होता. शनिवारी (१५ नोव्‍हेंबर) कामानिमित्त ऋषिकेश शहरात आला होता. सायंकाळी मित्रांसह दुचाकीने खुलताबादला भद्रा मारुतीच्या दर्शनाला गेला. तेथून फुलंब्रीमार्गे शहरात परतत असताना फुलंब्रीजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन उजव्या पायाला गंभीर इजा झाली. त्याला रामनगर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रविवारी दुपारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो शुद्धीवर आला नाही. त्यामुळे रात्री वसंतराव नाईक चौकातील वैद्यनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला हलविण्यात आले.

तिथे उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सोमवारी मध्यरात्रीनंतर त्याची प्रकृती अचानक चिंताजनक होऊन मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान हलगर्जीपणा केला, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यासाठी कुटुंबाची परवानगी घेतली नाही, असा आरोप करत ऋषिकेच्या नातेवाइकांनी करत संताप व्यक्त करायला सुरुवात केली. नातेवाइक, मित्रांची गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला. दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी आक्रमकपणे सुरू केल्याने तणाव वाढत गेला. त्यासाठी नातेवाइकांनी रुग्णालयात ठिय्या मांडला.

पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, सचिन इंगोले, सचिन कुंभार यांनी सहकाऱ्यांसह हॉस्पिटलमध्ये येऊन कुटुंबीयांची समजूत घातली. योग्य तपासाचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांचा संताप कमी झाला. दुपारी ३ ला त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या वेळी रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पुंडलिकनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, फुलंब्री पोलिसांकडे प्रकरण तपासासाठी वर्ग केले जाणार आहे. रात्री ऋषिकेशवर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबीयांचा आरोप...
रामनगरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत ऋषिकेशच्या फक्त पायाला दुखापत होती. तो शुद्धीत होता. शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक काही टेस्ट करतानाही तो व्यवस्थित बोलत होता. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला.
दरम्यान, या आरोपांबाबत दोन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका वृत्तपत्राशी बोलताना स्पष्टीकरण दिले असून, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. सचिन बेदमुथा यांनी सांगितले, की लाँग बोन फ्रॅक्चरमध्ये फॅट एम्बोलिझम साइट इफेक्ट पहायला मिळतो. यात रुग्णाला हार्टॲटॅक येतो. ऋषिकेशलाही असाच ॲटॅक आला. वैद्यनाथ रुग्णालयाचे डॉ. संदीप सानप म्हणाले, की रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला, तेव्हाच नातेवाइकांना त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची कल्पना नातेवाइकांना देण्यात आली होती. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software