- Marathi News
- सिटी क्राईम
- सानिकाच्या आईला पायावर नाक घासायला लावणाऱ्या संदीप लंके, कविता लंकेला अटक!, सर्वेश्वरनगरच्या घटनेतील...
सानिकाच्या आईला पायावर नाक घासायला लावणाऱ्या संदीप लंके, कविता लंकेला अटक!, सर्वेश्वरनगरच्या घटनेतील अन्य संशयितांच्या मागावर पोलीस!!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा भागातील सर्वेश्वरनगरमध्ये २२ जुलैला सकाळी ९ च्या सुमारास एका पोलीस निरीक्षकाचा भाऊ संदीप दत्तात्रय लंके (वय ४२, रा. पेशवेनगर, सातारा परिसर) आणि त्याची पत्नी कविता संदीप लंके (वय ३७) यांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवत दाम्पत्याला बेदम मारहाण केली होती. तुझ्या मुलीमुळे माझ्या मुलीची इज्जत गेली, असे म्हणत महिलेचे केस पकडून पायावर नाक घासून माफी मागायला लावली होती. लंके दाम्पत्याला गुन्हे शाखेने रविवारी (२७ जुलै) रात्री झाल्टा फाटा परिसरातून अटक केली आहे.
साताऱ्यातील सर्वेश्वरनगरमधील ४५ वर्षीय व्यक्तीची मुलगी सानिका (नाव बदलले आहे) व लंकेची मुलगी एकाच ट्यूशन क्लासमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी सानिका आणि लंकेच्या मुलीचे भांडण झाले. शिक्षकांनी दोघींचा वाद मिटवला आणि मुली पुन्हा चुकीच्या वाटेवर जाऊ नयेत म्हणून लंकेच्या मुलीला सानिकाची सर्वांसमोर माफी मागायला लावली होती. यामुळे लंकेच्या मुलीच्या मनात लज्जा निर्माण झाली. तिने घरी आल्यावर पालकांना सांगितले. त्यामुळे लंकेचा राग अनावर झाला. २१ जुलैला रात्री धमकावल्यानंतर २२ जुलैला त्याची खुमखुमी पुन्हा उफाळून आली. सकाळी ९ लाच त्याने पत्नी आणि दोन साथीदारांसह सानिकाचे घर गाठले होते. सानिकाच्या आई-वडिलांना लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. सानिकाच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर केस धरून लंकेच्या पत्नीच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली. सानिकाच्या वडिलांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर वार केले. दाम्पत्याचा आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत दाम्पत्याची सुटका केली. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिसांनीही तिथे धाव घेतली होती.
या प्रकरणात संदीप लंकेच्या पोलीस निरीक्षक भावाविरुद्धही धमकावल्याचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने सानिकाच्या ६८ वर्षीय आजोबाला कॉलवर धमकावले होते. मी दोन-चार दिवसांनी आल्यावर तुम्हाला बघून घेईल, असे पोलीस निरीक्षकाने धमकावले होते. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त संपतराव शिंदे करत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने कारवाईला सुरुवात केल्याचे दिसून आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 09:20:14
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...