बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि. यांच्यात आज, ३० जुलैला सामंजस्य करार झाला. टोयटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे बांधकाम होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत आणि टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने संचालक सुदीप दळवी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या वेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि कंपनी मिळून विविध क्षेत्रात सहकार्य करून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देऊ, असा विश्वास या वेळी दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आश्विनी लाटकर, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डॉ. आर.डी. कांबळे, उपजिल्हाधिकारी विजय राऊत, संगिता राठोड, टोयटा किर्लोस्कर कंपनीच्यावतीने वरिष्ठ उपाध्यक्ष तथा संचालक सुदीप दळवी, जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी.एस. तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

असा आहे प्रकल्प
बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत सध्या मराठी पहिले ते चौथी व उर्दू पहिली ते १० वी पर्यंत वर्ग आहेत. एकूण ८०० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. टोयोटा किर्लोस्करमार्फत उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत १२०० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, इतकी क्षमता निर्माण करण्यात येईल. याशिवाय अन्य शैक्षणिक सुविधांची निर्मिती करण्यात येईल. या करारानुसार ३० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, खेळाची खोली, स्वयंपाकघर, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदींचा समावेश आहे. याशिवाय सुरक्षितता, शिस्त व जीवनकौशल्यावर आधारित मूलभूत शिक्षणाचे साहित्यही दिले जाणार आहे. २०२५ ते २०२८ दरम्यान तीन टप्प्यांत ही कामे पूर्ण होणार आहेत.

उत्तम शैक्षणिक सुविधांची उपलब्धता : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी टोयोटा किर्लोस्करच्या या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रमाचा शिक्षण विकासासाठी विनियोग होत असल्याबद्दल अभिनंदन केले. बिडकीन येथील शाळेत गोरगरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथे या सुविधा निर्माण होऊन त्यांना उत्तम सुविधा मिळतील ही अधिक आनंदाची बाब आहे. दर्जेदार शिक्षण व संस्कारीत विद्यार्थी घडविण्यावर प्रशासनाचा भर आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जोडीला प्रशासन आहे. या प्रयत्नात टोयोटा किर्लोस्कर सारख्या संस्थेचे योगदान नक्कीच मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधांची उपलब्धता : जि.प. सीईओ अंकीत
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी सांगितले की, टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या सामाजिक उपक्रमांचे स्वागत आहे. या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा उपलब्ध होतील. शालेय इमारत ही शैक्षणिक उपयोजनासाठी असावी या पद्धतीने तिची रचना असावी, तसेच ही इमारत पर्यावरणपूरक असावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software