- Marathi News
- सिटी क्राईम
- CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटीं...
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्यात खळबळ

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध वरिष्ठ महाविद्यालयांनी शासनाला थोडाथोडका नव्हे तर तब्बल ६ कोटी ५३ लाख १६ हजार ५० रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजच्या हाती लागली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासन पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना ऑनलाइन राबवते. या ऑनलाइन योजनेत तब्बल १४१६ बनावट विद्यार्थी घुसवून ४ महाविद्यालयांच्या प्राचार्य, लिपिक कर्मचाऱ्यांनी शासनाची तिजोरी खाली करण्याचे काम २०२२ पासून २०२५ पर्यंत केले. सोयगावच्या एका युवकाने याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडे तक्रार केली होती. त्याआधारे दोन स्वतंत्र चौकशी समित्यांनी चौकशी केली आणि छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चेतना शिक्षण संस्थेचे कला वरिष्ठ महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या ४ महाविद्यालयांनी केलेला घोटाळा समोर आला. या प्रकरणात चारही महाविद्यालयांच्या प्राचार्य, कर्मचाऱ्यांसह बनावट लाभार्थ्यांवरही पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी (२९ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजने अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते. शासकीय वसतिगृहामध्ये पुरेशी क्षमता नसल्याने किंवा आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश न मिळाल्यामुळे पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मनपा हद्दीत भोजन भत्ता २८ हजार रुपये, निवास भत्ता १५ हजार रुपये, निर्वाह भत्ता ८ हजार रुपये असा एकूण एकूण ५१ हजार रुपये प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी खर्च देण्यात येतो. शासनाच्या https://swayam.mahaonline.gov.in या बेबसाईटवर महाविद्यालयास त्यांची प्रोफाईल, त्यांच्या युजर आयडीवर माहिती अद्यावत करावी लागते.
महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण शाखेचे लिपीक तपासणी व खात्री करतात. नंतर ते अर्ज अपर आयुक्त कार्यालय यांच्या पुढील मान्यतेसाठी त्यांच्या युजर आयडीवर पाठवितात. त्यावरून अपर आयुक्त कार्यालयाचे स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नावानुसार बिल जनरेट होते व ते संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडून पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतात. अशा प्रकारे योजने अंतर्गत रक्कम वितरीत होते. अशी स्वयंम ऑनलाईनची प्रक्रिया आहे.
सोयगावच्या युवकाने केली होती तक्रार
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजनेत सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या वर्षात विद्यार्थ्यांचे बनावट कागदपत्रे करून लाखो रुपयाचा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची तक्रार संदीप रामदास गवळे (रा. हाळदा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे १ एप्रिल २०२५ रोजी केली होता. या अर्जावरून चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आलेली आहे. चौकशी समितीने एकात्मिक विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील विद्यमान प्रकल्प अधिकारी म्हणून चेतना मोरे, अधीक्षक के. बी. भोरपे, प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विनोदकुमार सांगळे, कनिष्ठ लिपीक अविनाश सुरेश मुर्टे, सहारा शिक्षण संस्थेअंतर्गत चालणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलज, छत्रपती संभाजीनगरचे प्रभारी प्राचार्य, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आर्ट्स, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्रभारी प्राचार्य पठाण, कॉलेजचे कंत्राटी संगणक ऑपरेटर महेश रघुनाथ पाडळे, योजनेचे काम पाहणारे कार्यरत कर्मचारी समिर शामिर पठाण तसेच काही लाभार्थी व बनावट लाभार्थी यांच्याकडे विचारपूस करून चौकशी केली आहे. चौकशीत स्वयंम योजनेत ऑनलाईन बनावट विद्यार्थी संख्या समोर आली व त्यांना दिलेले अनुदानही समोर आले.
महाविद्यालये आणि हडपलेली रक्कम
-डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेजने सन २०२२-२३ मध्ये ७ विद्यार्थी दाखवून ३ लाख ३५ हजार ३०० रुपये व २०२३-२४ मध्ये ३४ विद्यार्थी दाखवून १६ लाख ९७ हजार ४५०, सन २०२४-२५ मध्ये ५०८ विद्यार्थी २ कोटी ४९ लाख ३६ हजार ९०० रुपये असे एकूण ५४९ विद्यार्थी दाखवून २ कोटी ६९ लाख ६९ हजार ६५० रुपयांचा घोटाळा केला आहे.
-डॉ. एपीजे अब्दुल कलाम आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स सिनियर कॉलेजने सन २०२२-२३ मध्ये १ विद्यार्थी दाखवून ४७ हजार ९०० रुपये, सन २०२३-२४ मध्ये ५३ विद्यार्थी दाखवून २६ लाख ७८ हजार ९५० रुपये, सन २०२४-२५ मध्ये ४८० विद्यार्थी दाखवून २ कोटी ३१ लाख ६१ हजार ८०० रुपये असे एकूण ५३४ विद्यार्थी दाखवून २ कोटी ५८ लाख ८८ हजार ६५० रुपये हडपले.
-चेतना शिक्षण संस्थेच्या कला वरिष्ठ महाविद्यालयाने सन २०२२-२३ मध्ये २५ विद्यार्थी दाखवून १२ लाख २३ हजार ५५० रुपये, सन २०२३-२४ मध्ये ३६ विद्यार्थी दाखवून १७ लाख ७५ हजार ९५०, सन २०२४-२५ मध्ये २२४ विद्यार्थी दाखवून ८७ लाख ३२ हजार १०० रुपये असे एकूण २८५ विद्यार्थी दाखवून १ कोटी १७ लाख ४१ हजार ६०० रुपये हडपले.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने २०२४-२५ मध्य ४८ विद्यार्थी दाखवून ७ लाख २६ हजार १५० रुपये हडपले.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल...
एस.आर. पेढेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिलेल्या अहवालानुसार, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलजचे प्राचार्य सय्यद अरशद अफसर, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम आर्ट्स, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य खलील पठाण, महाविद्यालयाचे लिपीक महेश रघुनाथ पाडळे, समिर शामीर पठाण व इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे लिपीक अविनाश मुर्दे तसेच बनावट लाभार्थी संदीप रामदास गवळे, परमेश्वर अशोक सोनवणे, राहुल नंदू साळवे, रवींद्र नंदू साळवे, कैलास श्रीपत गवळे, पल्लवी कैलास गवळे, महेश रघुनाथ पाडळे, स्वाती रघुनाथ पाडळे व इतर, मध्यस्थी एजंट यांच्याविरुद्ध तर प्रकल्प कार्यालय, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर व इतरांनी केलेल्या चौकशीनुसार चेतना शिक्षण संस्थेचे कला वरिष्ठ महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयांचे प्राचार्य, संबंधित कर्मचारी व इतरांनी कट रचून संगनमत करून स्वयंम ऑनलाईन प्रणालीचा दुरुपयोग करून, त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित नसलेल्या १४१६ विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे प्रवेश दाखवून ती कागदपत्रे बनावट आहेत हे माहिती असतानाही, ती खरी आहे असे भासवली. ते बनावट विद्यार्थी स्वयंम योजनेच्या पोर्टलवर दर्शवून शासनाची ६ कोटी ५३ लाख १६ हजार ५० रुपयांची फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे करत आहेत.