न्‍यू उस्मानपुऱ्यातील वसंत विहार सोसायटीत चोरट्यांनी घडवला थरार! : ४ लाखांच्या रोकडसह ३८ तोळे सोने, साडेतीन किलो चांदीवर डल्ला, शेजारच्यांनी जिवावर उदार होऊन चोरट्यांशी केले दोन हात !!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल ४ लाख १७ हजार रुपये रोख, ३८ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने व साडेतीन किलो चांदी चोरून नेली. कुत्रे भुंकू लागल्याने शेजाऱ्यांनी पाहिले असता चोर दिसले. त्यांनी आरडाओरड करून घराला घेराव घातला असता चोरट्यांनी कोयता उगारून पळ काढला. शेजाऱ्यांनी दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यात धांदल उडालेल्या चोरट्यांकडून मुद्देमालाची एक पिशवी रस्त्यावर पडली. ही धक्कादायक घटना न्‍यू उस्मानपुऱ्यातील झांबड इस्टेटजवळील वसंत विहार सोसायटीत शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) पहाटे घडली. शनिवारी (१४ फेब्रुवारी) उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्य सल्लागार विकास जगताप (वय ७६) कुटुंबासह वसंत विहार सोसायटीत राहतात. गुरुवारी (१२ फेब्रुवारी) ते कुटुंबासह पुण्याला गेले होते. शुक्रवारी पहाटे दोनला कुत्रे अचानक भुंकायला लागल्याने शेजारील नागरिक अनिल कुमावत यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात दोन चोर सोसायटीत शिरल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ दुसरे शेजारी प्रशांत दहिवडकर यांना कळवले. दहिवडकर व त्यांची दोन मुले ध्रुव व कृष्णा घराबाहेर आले. त्यांनी जगताप यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी घराला घेराव घातल्यामुळे चोरटे संतापले. त्यांनी घरातून बाहेर पडतानाच हातात कोयता घेतला. त्यांनी दहिवडकर यांच्यावर कोयत्याचा वार केला, मात्र सुदैवाने दहिवडकर यांनी तो चुकवला. त्यानंतर दोन्ही चोर सुसाट पळत सोसायटीबाहेर एका कारमागे उभ्या केलेल्या दुचाकीकडे धावले.

मात्र तोपर्यंत बराच आरडाओरड झाल्याने दुचाकी सोडून त्यांनी पळ काढला. दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून, चोरट्यांनी दुचाकीच्या नंबर प्लेटवर माती लावलेली दिसली. दोन पिशव्या घेऊन चोर पळत असताना प्रशांत दहिवडकर व त्यांच्या दोन्ही मुलांनी लाकडी दांड्यांसह चोरांचा पाठलाग सुरू केला. सोसायटीच्या सात फुटांच्या भिंतीवरून चोरांनी उडी मारली. यात दोन्ही चोर एकमेकांना धडकून एक पिशवी पडली. दहिवडकर यांची मुले जवळ येताच चोराने पुन्हा कोयता उगारला आणि पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दहिवडकर हे मागे न हटल्याने चोरांनी पळ काढणेच योग्य समजले. त्यामुळे या पिशवीतील २ किलो ६२  ग्रॅम चांदी आणि अंदाजे २० तोळे सोने व ४ घड्याळे वाचली. दीड किलोमीटर पाठलाग केल्यानंतर चोरटे दिसेनासे झाल्याने दहिवडकर आणि त्यांची दोन्ही मुले सोसायटीत परतली. घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी जगताप हे पुण्यावरून परतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. जगताप यांनी तक्रारीत जवळपास ३८ ताळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ लाख १७ हजारांची रोकड, साडेतीन किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे म्हटले आहे. लवकरच चोरांना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी पत्रकारांना सांगितले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software