- Marathi News
- सिटी क्राईम
- Full Story : वाळूज MIDC तील तिसगावमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, शाई, कागद, मशिनरीसह ८८ लाख...
Full Story : वाळूज MIDC तील तिसगावमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, शाई, कागद, मशिनरीसह ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ अटकेत, म्होरक्या अंबादास ससाणे फरारी

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अहिल्यानगर पोलिसांनी वाळूज एमआयडीतील तिसगावमध्ये बनावट नोटांचा छापखाना गुरुवारी (३१ जुलै) रात्री उद्ध्वस्त केला. ५०० रुपयांच्या ५९.५० लाखांच्या बनावट नोटा, २७.९० लाखांची मशिनरी, शाई, कागद व इतर साहित्य असा एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. छापखान्यात दोघांना पकडण्यात आले. त्याआधी रॅकेटमध्ये ५ जण अटकेत होते. मुख्य आरोपी फरारी झाला आहे. जप्त केलेल्या कागद व शाईचा पूर्ण वापर झाला असता तर आणखी २ कोटी १८ लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्या असत्या.
२७ जुलैला नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते हे गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली, की दोन व्यक्ती काळ्या महिंद्रा थार गाडीत फिरत असून, त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा आहेत. आंबिलवाडी शिवारात प्रत्येक पान टपरीवर बनावट नोटा देऊन सिगारेट खरेदी करत आहेत. गिते यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन आंबीलवाडी शिवारात थार गाडीतून फिरणाऱ्या निखील गांगर्डे व सोमनाथ शिंदे यांना पकडले. त्यांच्या गाडीत ८० हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा मिळून आल्या होत्या. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली त्यांनी बनावट नोटा बीडच्या प्रदीप कापरे याच्याकडून घेतल्याचे समोर आले. २८ जुलैला कापरेला पकडून पोलिसांनी चौकशी केली असता मंगेश शिरसाठ व विनोद अरबट यांची नावे समोर आली. ३० जुलैला पोलिसांनी मंगेश आणि विनोदला अटक केली. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसीच्या तिसगावमध्ये नोटा छापून बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात असल्याचे सांगितले. ३१ जुलैला रात्री पोलिसांनी तिसगाव शिवार गाठून बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करत आकाश बनसोडे व अनिल पवारला अटक केली. अंबादास ससाणे फरारी झाला आहे.

मुख्य आरोपी ससाणेची क्राइम हिस्ट्री...
ऑक्टोबर २०२३ मध्ये सर्वप्रथम अंबादास रामभाऊ ससाणे ऊर्फ अरुण भास्कर वाघ ऊर्फ मेजरचे (वय ४५, रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याचे नाव बनावट नोटाप्रकरणात चर्चेत आले होते. मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर हर्सूल कारागृहात असताना २०२० पासून खुनाच्या गुन्ह्यात बंदी असलेल्या आकाश बनसोडेसोबत त्याची ओळख झाली. अनिल पवार हाही हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. कारागृहातच सर्वांची मैत्री झाली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर पडल्यानंतर तिघांनी छापखाना सुरू केला. लाखोंच्या मशिनरी, प्रिंटरचा सेटअप उभारून बनावट नोटांचा छापखाना सुरू केला.
गुरुवारी तिसगावमध्ये छापखान्यावर पोलिसांनी धडक दिली तेव्हा ससाणे लगेचच फरारी झाला. छापखाना बंद करून मेसवर जेवायला गेलेल्या आकाश बनसोडे, अनिल पवारच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. छापखान्यासाठी ससाणे याने ३ महिन्यांपूर्वी तीसगावमध्ये निर्मनुष्य परिसरात आलिशान घर भाड्याने घेतले होते. घराचा मालक शहरात राहतो. नोटांच्या छपाईसाठी ७ लाखांचे कलर प्रिंटर ससाणेने विकत घेतले होते. छपाईसाठी शाई व कागद भोपाळहून मागवत होता. २०२३ मध्ये ससाणेला अटक झाली असली तरी त्याआधी २०१५ व २०२० मध्येही त्याच्याविरुद्ध बनावट नोटांप्रकरणीच २ गुन्हे दाखल आहेत, हे विशेष. ससाणे हा ओळखीच्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एजंट बनवायचा.