- Marathi News
- सिटी क्राईम
- वडिलांनंतर आजी-आजोबा नव्हे तर आईच मुलीची नैसर्गिक पालक!; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा...
वडिलांनंतर आजी-आजोबा नव्हे तर आईच मुलीची नैसर्गिक पालक!; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच वर्षीय मुलीच्या ताब्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे, की अल्पवयीन मुलीचे पहिले पालक वडील आणि नंतर आई असतात. या प्रकरणात, मुलगी आधी तिच्या वडिलांसोबत राहत होती. घटस्फोटानंतर, तिच्या आईने मुलीचे पालकत्व तिच्या वडिलांना दिले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगी आजी-आजोबांकडे (वडिलांच्या आई-वडिलांकडे) राहत होती. आईने मुलीचा ताबा मागितला होता, जो जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जिथे निर्णय मुलीच्या आईच्या बाजूने लागला आहे.
मुलगी एक वर्षाची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. तिची आई तिच्या माहेरच्या लोकांवर अवलंबून होती. त्यामुळे तिने मुलीचा ताबा तिच्या वडिलांना देण्यास सहमती दर्शविली. जानेवारी २०२५ मध्ये या पाच वर्षांच्या मुलीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर मुलीच्या आजी-आजोबांनी (वडिलांचे आई-वडील) मुलीचे पालक होण्यासाठी अर्ज केला. मात्र त्याचवेळी मुलीच्या २५ वर्षीय आईनेही पुढे येऊन मुलीचा ताबा मागितला. जिल्हा न्यायालयाने मुलीच्या ताब्यासाठी आईचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मुलीच्या आईने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयात तिने सांगितले की आजी-आजोबा म्हातारे होत आहेत आणि ते मुलीची काळजी घेऊ शकणार नाहीत. आता ती चांगली कमाई करत आहे आणि तिच्या मुलीची चांगली काळजी घेऊ शकते.
सुनावणीनंतर, न्यायमूर्ती एसजी चपळगावकर यांच्या खंडपीठाने पाच वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे सोपवला. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की जेव्हा पाच वर्षांच्या मुलीचा प्रश्न येतो तेव्हा न्यायालय हे तथ्य दुर्लक्ष करू शकत नाही की आई तिची सर्वोत्तम पालक असू शकते. आई जे प्रेम आणि काळजी देऊ शकते. त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. जर आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईकांनी काही काळासाठी मुलीला वाढवले असेल, तरी खऱ्या पालकाला मुलीच्या ताब्यातून वंचित ठेवता येणार नाही. जोपर्यंत असे दिसून येत नाही की मुलीचे हित धोक्यात आहे, तोपर्यंत आईकडे ताबा राहील.
न्यायालयाने असेही म्हटले आहे, की घटस्फोटाच्या वेळी आईने मुलीचा ताबा तिच्या पतीला दिला होता, याचा अर्थ असा नाही की तिने मुलीला सोडून दिले होते. घटस्फोटावेळी, ती स्वतः तिच्या पालकांवर अवलंबून होती आणि तिचे कोणतेही उत्पन्न नव्हते. न्यायालयाने मुलीला तिच्या आईकडे सोपवण्याचा आदेश दिला. मात्र आजी- आजोबांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मुलीला भेटण्याची परवानगी असेल.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 09:20:14
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...