शेजाऱ्याकडून व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला!; पाडसवान हत्‍येची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न, उस्मानपुऱ्यातील धक्कादायक प्रकार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मोबाइलवर जोरात बोलत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने आधी मुलाला शिवीगाळ केली. त्याला समजावयाला आलेल्या व्यावसायिकावर बॅट, हॉकीस्टिक, चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. उस्मानपुरा पोलिसांनी विजय वडमारे नावाच्या या माथेफिरूला अटक केली असून, त्‍याच्या दोन्ही मुलांविरुद्धही हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) रात्री १० च्या सुमारास उस्मानपुऱ्यातील सिटी केअर हॉस्पिटलजवळील नभराज लालित्य अपार्टमेंटमध्ये घडली.

या प्रकरणात कमलकुमार जीवनमल कोठारी (वय ५४, रा. उल्कानगरी, गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिली आहे. ते औद्योगिक साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करतात. त्यांचा दुसरा फ्लॅट उस्मानपुऱ्यातील नभराज लालित्य अपार्टमेंटमध्ये आहे. तिथे त्यांच्या भावाचा मुलगा राहुल कोठारी राहतो. कमलकुमार यांचा मुलगा ऋषभ व पुतण्या राहुल यांना २८ ऑगस्टला रात्री कोल्हापूरला जायचे असल्याने ऋषभ हा उस्मानपुऱ्यातील फ्‍लॅटवर गेला होता. रात्री १० ला कमलकुमार यांना ऋषभचा कॉल आला, की फ्‍लॅटचा दरवाजा लॉक झाला आहे व मी बाहेर राहिलो आहे. तुम्ही दुसरी चावी पाठवा... त्याचवेळी समोरच्या फ्‍लॅटमध्ये राहणारा विजय वडमारे हा घराबाहेर आला व ऋषभला म्हणाला, की ओरडू नकोस. मोबाइलवर कशाला बोलत आहे.

मला त्याचा त्रास होत आहे. त्यावर ऋषभ त्याला म्हणाला, की काका मी खाली जाऊन बोलतो. त्यावर वडमारे म्हणाला, की तू खाली जाऊ नकोस. तुझ्या वडिलांना येथे बोलाव, असे म्हणून त्याने ऋषभला शिवीगाळ सुरू केली. ती शिवीगाळ कमलकुमार यांना ऐकू येत होती. त्यामुळे ते लगेचच उल्कानगरीतून उस्मानपुऱ्यातील फ्‍लॅटवर आले. त्याचवेळी थोड्याच वेळात राहुलही तिथे आला. राहुल त्यांना समजावत होता, की आपण शेजारी आहोत. शिवीगाळ करू नका... कमलकुमार यांनी वडमारेला ‘तुम्ही तुमच्या घरात जा.’ असे सांगून राहुल आणि ऋषभ यांना लिफ्टमधून खाली पाठवले. कमलकुमार हे जिन्यातून खाली जात असताना वडमारेने त्याच्या दोन्ही मुलांना आवाज देऊन घरातून बोलावले. तेव्हा त्‍याची दोन्ही मुले घराबाहेर क्रिकेटची बॅट, हॉकीस्टिक, चाकू घेऊनच आली. वडमारेने दोन्ही मुलांना चिथावले, की आज यांना मारूनच टाकू. विजय वडमारेने बॅट कमलकुमार यांच्या डोक्यात मारली.

दुसऱ्या मुलाने हॉकीस्टिक डावा हात व मनगटावर मारून कमलकुमार यांना जखमी केले. त्‍याचवेळी विजय वडमारेने चाकूने कमलकुमार यांच्यावर वार केला. तो वार कमलकुमार हे चुकवत असताना चाकू कमरेच्या डाव्या भागावर लागून कमलकुमार जखमी झाले. त्यामुळे घाबरून कमलकुमार यांनी वेगाने पळ काढत खाली आले व उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्‍यांना मेडिकल मेमो देत घाटी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी विजय वडमारे व त्‍याच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करत विजय वडमारेला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे करत आहेत. विजय वडमारे हा नभराज लालित्य अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतो. तेथील नागरिकांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून त्याने घरभाडेही दिलेले नाही. तो किरकोळ कारणावरून अपार्टमेंटमध्ये वाद करून अश्लील शिवीगाळ करत असतो. त्याच्या वागण्यामुळे चार ते पाच भाडेकरू घर सोडून दुसरीकडे राहण्यास गेले असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. सिडको एन ६ संभाजी कॉलनीत निमोणे कुटुंबाने शेजारी प्रमोद पाडसवान यांच्या केलेल्या हत्‍येमुळे शहर हादरले असताना, तशाच स्वरुपाची टोकाची घटना उस्मानपुऱ्यात समोर आल्याने चिंता व्यक्‍त होत आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षण मागत असल्यानेच आमचा जरांगेंना विरोध, छ. संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट

Latest News

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षण मागत असल्यानेच आमचा जरांगेंना विरोध, छ. संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षण मागत असल्यानेच आमचा जरांगेंना विरोध, छ. संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, यासाठी मनोज जरांगे यांनी टोकाचे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या...
नागरिकच झाले आंदोलनाची ‘बी टीम’ : सरकारकडून गैरसोय : छत्रपती संभाजीनगरातून ‘रसद’; गावागावांतून मराठाबांधवांसाठी ट्रक, टेम्‍पो भरून शिदोऱ्या रवाना!
लाचखोर पोलीस हवालदार अब्‍दुल शेख ५ हजार घेताना पकडला!; सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात ACB ची कारवाई
उस्मानपुऱ्यात आढळलेल्या अर्भकप्रकरणी महिनाभराने गुन्हा दाखल, चेंबरमध्ये आढळले होते स्‍त्री जातीचे मृत बाळ
वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software