नागरिकच झाले आंदोलनाची ‘बी टीम’ : सरकारकडून गैरसोय : छत्रपती संभाजीनगरातून ‘रसद’; गावागावांतून मराठाबांधवांसाठी ट्रक, टेम्‍पो भरून शिदोऱ्या रवाना!

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. लाखो मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र आंदोलनस्थळी आणि इतरत्र सरकारने आंदोलकांची कुठलीही सोय न केल्याने आंदोलकांचे हाल होत आहेत. त्‍यातच पहिले दोन दिवस अन्न-पाण्याची टंचाई जाणवली. खाणावळी, खाऊगल्ली बंद आहेत. आंदोलकांनी सोबत नेलेली शिदोरीही संपली. त्‍यामुळे राज्‍यभरातून आंदोलकांसाठी शिदोरी पोहोचती केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरातील उद्योजक, नागरिकांनीही एकत्र येऊन भाकरी, पोळ्या, पुरी, ठेचा, लोणचे, सुकी भाजी, पाणी बॉटल्स आणि बिस्किटांची पाकिटे टेम्‍पो व ट्रक भरून मुंबईला पाठवले आहे.

शनिवारी रात्रभर बकवालनगर, वाळूज, बजाजनगर येथील अनेक घरांत अन्नपदार्थ तयार करण्यात आले. उद्योजक डॉ. शिवाजी कान्हेरे यांच्या कंपनीतून मुंबईला मराठा बांधवांसाठी अन्नपाणी जात असल्याचे कळल्यावर नागरिकांनी शिदोऱ्या आणून दिल्या. हर्सूल सावंगी येथील गावकऱ्यांनीही २ क्विंटल धान्याच्या पोळ्या, भाकरी व पाण्याच्या बाटल्यांचे २०० खोके रविवारी टेम्‍पोतून पाठवले. याशिवाय छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वराज ग्रुप, खुलताबाद तालुक्‍यातील गल्लेबोरगाव, कन्‍नड तालुक्यातील अंतापूर, केसापूर, टाकळी वैसपूर, छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील करमाड, चित्तेपिंपळगाव, भालगाव, निपाणी, आडगाव, चित्तेगाव ग्रामस्थांनीही रसद रवाना केली.

आळंदमध्ये रास्ता रोको
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील आळंद येथे रविवारी मराठा बांधवांनी रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प करण्यात आली. त्‍यामुळे दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. 

हा कोण शिवभक्‍त?
मराठा आरक्षण लढाईत मनोज जरांगे यांचा राग असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ एक शिवभक्‍त नावाने छत्रपती संभाजीनगरात विविध चौकात ५० हून अधिक फलक झळकले आहेत. या फलकांवर फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेली कामे दर्शवली आहेत. सध्या मराठा बांधव हे आरक्षणप्रश्नी आक्रमक असल्याने फलकांवर फडणवीसांच्या समर्थकांची नावे नाहीत, हे विशेष. फडणवीस यांचे ऐतिहासिक निर्णय व कार्य या शीर्षकाखाली फलक लागले आहेत. दरम्‍यान, या फलकांबद्दल मराठा नेते चंद्रकांत भराटे म्हणाले, की पोस्टर्सवर नाव नाहीत, याचा अर्थ तो सरकारचाच दलाल आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पपईच नाही तर त्याच्या पानांमध्येही आरोग्याचा खजिना

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software