लाचखोर पोलीस हवालदार अब्‍दुल शेख ५ हजार घेताना पकडला!; सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात ACB ची कारवाई

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लाचखोर पोलीस हवालदार अब्दुल हैदर खलील शेख (वय ५४) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी रंगेहात पकडले. तो नियुक्‍त असलेल्या सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारातच त्‍याला ५ हजार रुपये घेताना बेड्या पडल्या. गुन्ह्याचा बी समरी अहवाल पाठविण्यासाठी त्याने पैसे मागितले होते.

एसीबीकडे शेखच्या लाचखोरीबद्दल तक्रार करणाऱ्या व्यक्‍तीविरुद्ध २२ फेब्रुवारी २०२४५ रोजी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करत होते. मुंढे यांना भेटण्यासाठी तक्रारदार १४ ऑगस्टला पोलीस ठाण्यात आले असता हवालदार शेखने गुन्हा बी फायनल करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली. जडजोडीअंती त्याने २० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराने त्‍याला १० हजार रुपये दिले. उर्वरित १० हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

रविवारी तक्रारदाराला एसीबीने सरकारी पंचासह पोलीस उपनिरीक्षक मुंढे व हैदर शेखकडे पाठवले. मुंढे यांनी लाच मागितली नाही. त्यानंतर तक्रारदार हे शेखला भेटले असता त्याने ५ हजार रुपये पंचासमक्ष घेतले. त्‍याचवेळी तक्रारदाराने एसीबी पथकाला इशारा केला आणि दबा धरून बसलेल्या पथकाने शेखवर झडप घातली. त्‍याच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याच्या अंगझडतीत ३ हजार ३५० रुपयांची रोख रक्‍कम सापडली.

कशासाठी घेतली लाच?
पोलीस तपासात आरोपी किंवा गुन्ह्याचा कोणताही पुरावा आढळला नाही तर तो गुन्हा बंद करण्यासाठी अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्याच्या प्रक्रियेला बी फायनल असे म्हणतात. हा अहवाल स्वीकारल्यानंतर न्यायालय तो गुन्हा कायमचा बंद करते. शेख यासाठीच लाच मागत होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पपईच नाही तर त्याच्या पानांमध्येही आरोग्याचा खजिना

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software