- Marathi News
- जिल्हा न्यूज
- बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत के...
बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि. यांच्यात आज, ३० जुलैला सामंजस्य करार झाला. टोयटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे बांधकाम होणार आहे.
बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत सध्या मराठी पहिले ते चौथी व उर्दू पहिली ते १० वी पर्यंत वर्ग आहेत. एकूण ८०० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. टोयोटा किर्लोस्करमार्फत उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत १२०० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, इतकी क्षमता निर्माण करण्यात येईल. याशिवाय अन्य शैक्षणिक सुविधांची निर्मिती करण्यात येईल. या करारानुसार ३० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, खेळाची खोली, स्वयंपाकघर, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदींचा समावेश आहे. याशिवाय सुरक्षितता, शिस्त व जीवनकौशल्यावर आधारित मूलभूत शिक्षणाचे साहित्यही दिले जाणार आहे. २०२५ ते २०२८ दरम्यान तीन टप्प्यांत ही कामे पूर्ण होणार आहेत.
उत्तम शैक्षणिक सुविधांची उपलब्धता : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी टोयोटा किर्लोस्करच्या या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रमाचा शिक्षण विकासासाठी विनियोग होत असल्याबद्दल अभिनंदन केले. बिडकीन येथील शाळेत गोरगरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथे या सुविधा निर्माण होऊन त्यांना उत्तम सुविधा मिळतील ही अधिक आनंदाची बाब आहे. दर्जेदार शिक्षण व संस्कारीत विद्यार्थी घडविण्यावर प्रशासनाचा भर आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जोडीला प्रशासन आहे. या प्रयत्नात टोयोटा किर्लोस्कर सारख्या संस्थेचे योगदान नक्कीच मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधांची उपलब्धता : जि.प. सीईओ अंकीत
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी सांगितले की, टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या सामाजिक उपक्रमांचे स्वागत आहे. या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा उपलब्ध होतील. शालेय इमारत ही शैक्षणिक उपयोजनासाठी असावी या पद्धतीने तिची रचना असावी, तसेच ही इमारत पर्यावरणपूरक असावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.