छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लग्नात २ लाखांचा खर्च, गंठणसाठी १ लाख रुपये, नंतर प्लॉटसाठी ३ लाख रुपये देऊनही सासरच्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी घर बांधण्यासाठी १० लाख रुपये आण म्हणून २४ वर्षीय विवाहितेचा छळ मांडला. गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करत घरातून हाकलून दिले. चिकलठाणा पोलिसांनी पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्रद्धा ज्ञानेश्वर ताठे (वय २४, रा. मोरहिरा ता. जि. छत्रपती संभाजीनगर ह. मु. आडगाव बुद्रूक ता. जि. छत्रपती संभाजीनगर) या विवाहितेने या प्रकरणात १७ ऑक्टोबरला तक्रार दिली आहे. तिचे लग्न ३१ मे २०२० रोजी मोरहिरा येथील ज्ञानेश्वर रावसाहेब ताठे याच्यासोबत झाले होते. लग्नात खर्चासाठी दोन लाख रुपये देऊन तिच्या आई-वडिलांनी लग्न लावून दिले होते. गंठण घेण्यासाठी एक लाख रुपये दिले. एक वर्षापूर्वी प्लॉट घेण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी ३ लाख रुपयेसुद्धा तिच्या सासरच्या लोकांना दिले असल्याने श्रद्धाने तक्रारीत म्हटले आहे. पती ज्ञानेश्वर, सासरे रावसाहेब लिंबाजी ताठे, सासू जिजाबाई रावसाहेब ताठे, दीर वैजिनाथ रावसाहेब ताठे (सर्व रा. मोरहिरा), नणंद लता विष्णू घुगे, नंदोई विष्णू दत्ता घुगे (दोघे रा. मयुर पार्क छत्रपती संभाजीनगर) यांनी लग्नानंतर एक वर्ष श्रद्धाला चांगले वागवले.
यादरम्यान तिला एक मुलगी झाली. २१ नोव्हेंबर २०२१ नंतर सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. मारहाण व शिवीगाळ करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. माहेराहून १० लाख रुपये घर बांधण्यासाठी घेऊन ये, म्हणून त्रास देत होते. नणंद, नंदोईसुद्धा मोरहिरा येथे आल्यानंतर तिला त्रास देत असत. फोनद्वारेदेखील पतीला त्रास देण्यास सांगून पैशाची मागणी करत असत, असे श्रद्धाने तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल व चांगले नांदवतील, या आशेवर श्रद्धा त्यांचा छळ सहन करत होती. तिने होणारा त्रास आई, वडील, काका, मावशी यांना सांगितला असता त्यांनी तिच्या सासरच्यांना मुलीला त्रास देऊ नका, असे समजावून सांगितले. मात्र पती रात्री-अपरात्री दारू पिऊन आल्यावर छोट्या छोट्या कारणावरून भांडण करून तिला चापट लाथाबुक्क्याने मारहाण करत.
गळा दाबून जीवंत मारून टाकण्याची धमकी देत, असे तक्रारीत श्रद्धाने म्हटले आहे. नणंद, नंदोई हेही सासरच्यांना श्रद्धाला घराबाहेर काढा असे सांगत. त्यामुळे पती, सासू व सासऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व म्हणाले की, तू जर पैसे आणत नसेल तर आमच्या घरातून निघून जा. ८ जुलै २०२५ रोजी पती, सासू, सासरे, दीर यांनी मारहाण करत तिला घरातून बाहेर काढून दिले. जोपर्यंत तू पैसे घेऊन येणार नाही. तोपर्यंत तू मोरहिरा येथे यायचे नाही, असे सांगितले तेव्हापासून ती माहेरी आई-वडिलांकडे राहते. तू जर आमच्याविरुद्ध तक्रार दिली तर तुझे आई- वडिल व तुझा भाऊ यांना आम्ही त्रास देऊ. तुझ्या भावाचे शिक्षण चालू असून त्याच्यावर आम्ही खोटा गुन्हा दाखल करून त्याचे नुकसान करू, अशा धमक्या सासरच्यांनी दिल्याने श्रद्धाने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार निवृत्ती मदने करत आहेत.