- News
- पॉलिटिक्स
- भाजप-शिंदे गटाची पहिली बैठक, अजित पवार गट-रिपाइंला बोलावलेच नाही, महायुती करण्यावर सकारात्मकता, जागा...
भाजप-शिंदे गटाची पहिली बैठक, अजित पवार गट-रिपाइंला बोलावलेच नाही, महायुती करण्यावर सकारात्मकता, जागा वाटपाचा वाद टाळला..!, बैठकीनंतर कोण काय म्हणालं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काही उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते वेगळी चूल मांडणार असल्याचे दिसत आहे. परिणामी भाजप-शिंदे गटाने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी (१६ डिसेंबर) बैठकीला बोलावले नाही. रिपाइं आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही पहिल्या बैठकीचे नियंत्रण नव्हते. पहिल्या बैठकीनंतर आता मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांची स्वतंत्र बैठक होणार आहे. बैठकीनंतर महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.
ठाकरे गटाला पुन्हा एकदा भगदाड पाडण्याचा मनसुबा भाजप-शिंदे गटाने रचला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी थेट महानगरप्रमुख राजू वैद्य यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वैद्य यांनी आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात आ. अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वर्चस्वस्वाद उफाळून आला आहे. दानवेंचे खैरे ऐकत नाहीत, तर खैरेंनी सूचवलेले उमेदवार दानवे यांना मान्य नाहीत, असे बोलले जात आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाकडे निवडणूक रणनीतीकार म्हणून जे पदाधिकारी काम करत आहेत त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप-शिंदे गटाकडून सुरू आहेत. यात प्रामुख्याने महानगरप्रमुख राजू वैद्य यांचे नाव समोर आले आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्याने भाजप, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मंगळवारीही काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाला लागलेली गळती आणि अभ्यासू चेहरे नसल्याने बहुतांश प्रभागांत नाइलाजाने उमेदवारी देण्याची वेळ ठाकरे गटावर आली आहे. दरम्यान, राजू वैद्य यांनी महायुतीचे नेते संपर्क साधत असल्याची कबुली दिली. मात्र आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचे निःक्षून सांगितले.
ठाकरे गट स्वतंत्र लढण्याची शक्यता...
दरम्यान, काँग्रेसने महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला सोबत घेण्याबाबत प्रतिकूलता दर्शवली आहे. काँग्रेसला ठाकरे गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आघाडीसाठी फायदेशीर वाटत असून, शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव मुंबईत झालेल्या शहराध्यक्षांच्या बैठकीत वरिष्ठांकडे मांडला आहे. दरम्यान, काँग्रेससोबत अद्याप कुठलीही चर्चा नाही. ते स्वतंत्र निवडणूक लढवू इच्छित असल्यास आमचीही तयारी आहे, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
रिपाइंमध्ये पक्ष चिन्हाचा संभ्रम...
दरम्यान, महापालिका कोणत्या निवडणूक चिन्हावर लढायची याबद्दलचा रिपाइंतील संभ्रम कायम आहे. रिपाइंने निवडणूक आयोगाकडे ऊस उत्पादक शेतकरी हे चिन्ह मागितले आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळे भाजपच्या कमळावर लढायचे की अन्य चिन्ह मिळणार, याबद्दल रिपाइंच्या इच्छुकांना प्रश्न पडला आहे. तूर्त भाजपकडे रिपाइंने १५ जागा मागितल्या आहेत. मात्र महायुतीच्या पहिल्या बैठकीला रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात न आल्याने रिपाइं नाराज आहे.

