- News
- जिल्हा न्यूज
- हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मु...
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद, मान्यवरांनी भाषणांतून पालकांना केले ‘अलर्ट’
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण शहरातील संतनगर परिसरातून १८ वर्षीय हिंदू मुलीचे लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून अपहरण करणाऱ्या चिराग अतहर अहमद फारुकी याच्या मुसक्या ४८ तासांतच आवळण्यात पैठण पोलिसांना यश आले आहे. त्याला मुलीसह नवी मुंबईतील घनसोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
चिराग हा महाराष्ट्र कॉम्प्युटर सेंटर नावाने क्लासेस चालवतो. मुलीच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार केली होती. त्यांनी मोठ्या भावाकडे पैठणच्या संतनगर भागात मुलीला शिक्षणासाठी ठेवले होते. पीडित मुलगी ऐश्वर्या (नाव बदलले आहे) कॉम्प्युटर क्लासेससाठी महाराष्ट्र कॉम्प्युटर सेंटरमध्ये जात होती. तिला तेथील शिक्षक चिराग फारुकी हा शिकवत होता. गेल्या आठवड्यात ऐश्वर्याने घरी सांगितले होते, की चिराग हा तिला त्याच्यासोबत लग्न कर, असे म्हणत होता. त्यामुळे तिने एक आठवड्यापासून क्लासेसला जाणे बंद केले होते. बुधवारी दुपारी तीनला ऐश्वर्या घरी असताना चिरागने साथीदारासह येऊन तिला आवाज दिला. ऐश्वर्या गेटकडे गेली असता चिरागने मुलीचा हात पकडून ओढले.
सकल हिंदू समाजाचा मोर्चा
हिंदू मुलीचे धर्मांधाने केलेल्या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात रविवारी (१ मार्च) सकाळी ११ ला सकल हिंदू समाजाने भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात शहरातील खंडोबा मंदिर परिसरातून झाली. यात शहर व ग्रामीण भागातील संत महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, विद्यार्थी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हातात फलक घेऊन नागरिक सहभागी झाले. मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे आणि सर्वांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन मान्यवरांनी भाषणातून केले. प्रकरणातील तरुणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तपास निष्पक्ष व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

