- Marathi News
- सिटी क्राईम
- लाचखोर पोलीस उपनिरीक्षक बहुरेविरुद्ध आता पत्नीच्या छळाचा गुन्हा दाखल, सातारा पोलीस ठाण्यात विवाहिते...
लाचखोर पोलीस उपनिरीक्षक बहुरेविरुद्ध आता पत्नीच्या छळाचा गुन्हा दाखल, सातारा पोलीस ठाण्यात विवाहितेने सांगितली २०१६ ते २०२५ पर्यंतची कहानी...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध आता त्याच्या पत्नीने शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. माहेरावरून १० लाख रुपये आणण्यासाठी बहुरेने केलेल्या छळाची कहानीच तिने सातारा पोलीस ठाण्यात सांगितली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र किसन बहुरे (वय ३७, रा. बेंबळेची वाडी, ता. पैठण, ह. मु. पोलीस मुख्यालय, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
एप्रिल २०२३ मध्ये तिचा पती महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकॅडमी नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ट्रेनिंगसाठी गेला होता. ट्रेनिंगदरम्यान दीड महिना विवाहितेला नाशिकला घेऊन जात त्यांच्या नातेवाइकांकडे ठेवले. रविवारी तो विवाहितेला भेटण्यासाठी येत होता. नंतर पतीने तिला छत्रपती संभाजीनगर येथे राहत्या घरी आणून सोडले, तेव्हा तिला पतीच्या वागण्यात बदल झालेला दिसला. जानेवारी २०२४ मध्ये पतीची ट्रेनिंग झाल्यानंतर तिच्या पतीला छत्रपती संभाजीनगर शहरातीलच सातारा पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली. लक्ष्मी कॉलनीत राहायला असूनसुध्दा पती घरी येत नव्हता. त्यामुळे विवाहिता मुलीसह सातारा पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा पती तिला म्हणायचा, तू तुझ्या वडिलांकडून जोपर्यंत दहा लाख रुपयांचे दागिणे आणणार नाहीस, तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही व घरीही येणार नाही. तिच्याशी नीट बोलायचा नाही व भेटणे टाळायचा. विवाहितेला नांदविण्यास नकार देऊन घरी येत नव्हता. घरखर्चासाठी पैसे सुध्दा देत नव्हता.
भरोसा सेलवाले कॉल करून थकले...
वैतागलेल्या विवाहितेने त्रासाला कंटाळून ३० मार्च २०२४ रोजी महिला सहाय्यता कक्षात तक्रार दिली. तेथे पतीने नांदवण्यास तयार असल्याचे लिहून दिले. मात्र तिथून बाहेर येताच पुन्हा बदलला. त्यामुळे विवाहितेने पुन्हा ५ जुलै २०२५ रोजी भरोसा सेलमध्ये अर्ज दिला. भरोसा सेलने वारंवार फोन करून बोलावले तरी तो कोणत्याच तारखांना हजर झाला नाही. अखेर विवाहितेने सातारा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निर्मला राख करत आहेत.
हॉटेलचालकाकडून घेतली होती ५ हजारांची लाच
धाराशिव येथे प्रशिक्षण कालावधीच बहुरे याने एका हॉटेलचालकाकडून १५ जुलै २०२५ रोजी ५ हजारांची लाच घेतली होती. १ लाख ६० हजारांची मागणी करून १ लाख ५५ हजार रुपये त्याच दिवशी घेऊन उरलेले ५ हजार घेताना एसीबीने त्याला रंगेहात पकडले होते. हॉटेलसमोर बकऱ्या, शेळ्या मिळून आल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने हॉटेलचालकाला लाच मागितली होती. सध्या त्याची नियुक्ती धाराशिव मुख्यालयात आहे.