छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खासगी शाळेच्या संस्थाचालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी एका वृत्तपत्राच्या संपादकासह त्याच्या पत्नीविरुद्ध वाळूज पोलिसांनी आज, ३ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेले बुलबुले दाम्पत्य.
जगदीश बुलबुले व सौ. पायल जगदीश बुलबुले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध चेतन चंद्रकांत बोरोले (वय ३६, रा. समता कॉलनी, शिवाजीनगर, वाळूज) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत बोरोले यांनी म्हटले आहे, की पायल बुलबुले यांनी माहिती अधिकारातून स्वरा फाउंडेशन संचालित लिटल चॅम्प प्री प्रायमरी स्कूल व ज्ञानप्रबोधिनी स्कूल या शाळेच्या मान्यता संचिकेची साक्षांकित छायाप्रत मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. त्याबाबत त्यांना ज्ञानप्रबोधिनी पब्लिक स्कूल, वाळूज ही शाळा फक्त प्री प्रायमरी असून पुढील कोणतेही वर्ग सुरू नाही, अशी माहिती पुरवली. तरीही पायल बुलबुले यांनी वारंवार माहिती अधिकारातून एकच माहिती मागून त्रास दिला. एका वृत्तपत्राचे संपादक जगदिश बुलबुले व पायल बुलबुले हे शाळेबद्दल चुकीची माहिती छापून शाळेची बदनामी करत आहेत.
शाळेतील पालकांना वैयक्तिक त्यांच्या मोबाइल क्रमांकावर पेपरची बातमी पाठवून शाळेला मान्यता नाही. मुलांना शाळेत पाठवू नका, असे सांगत आहे. शाळेवरील शिक्षक यशवंत महाजन हे बुलबुले दाम्पत्याच्या शेजारी राहत असल्याने संस्थाचालक बोरोले यांनी त्यांना असे का करत आहे, याबाबत विचारपूस करण्यास सांगितले होते. ११ ऑगस्टला शाळेचे शिक्षक यशवंत महाजन यांनी बुलबुले यांना त्यांच्या मोबाइलवर संस्थाचालकासमोरच कॉल करून विचारले तेव्हा त्यांनी आम्ही हे सर्व थांबवतो. आम्हाला शाळेचे संस्थाचालक चेतन बोरोले यांना तीन लाख रुपये द्यायला सांग, असे म्हटले. कॉलवरील संभाषण बोरोले यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले. कॉल रेकॉर्डिंगमध्ये पायल बुलबुले या दोन ते अडीच लाख रुपयांची मागणी करत आहेत, असे बोरोले यांनी तक्रारीत म्हटले आहे. बुलबुले यांनी ज्याच्याकडून घर विकत घेतले, त्या संदीप देवकर यांना बोरोले ओळखतात.
त्यांना बोरोले म्हणाले, की तुम्ही ज्यांना घर विकले ते बुलबुले दाम्पत्य मला त्रास देत आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा. त्यावर त्यांनी बोरोले यांच्या वतीने बुलबुले दाम्पत्याशी चर्चा केली. त्यानंतर देवकर यांनी बोरोले यांना सांगितले, की ते ऐकण्यास तयार नाहीत. ते तीन लाख रुपये म्हणत होते. मी दोन लाख रुपयांसाठी तयार केले आहे, असे सांगितले. त्यानंतर १६ ऑगस्ट २०२५ रोजी चेतन बोरोले व त्यांची पत्नी चेतना बोरोले, शाळेचे शिक्षक यशवंत महाजन व त्यांची पत्नी असे सर्व जण बुलबुले दाम्पत्याला हॅप्पी हॉटेल वाळूज येथे भेटले. तेथे त्यांनी तडजोडी अंती अडीच लाख रुपये मागितले. त्यातील एक लाख पंचवीश हजार आता द्यायचे व एक लाख पंचवीश हजार एक महिन्याने द्यायचे, खंडणीची मागणी केली. त्यानंतर बोरोले यांनी थेट वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.