- News
- कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आसेगाव-निजामपूर शिवारातील गट नं. १९ मधील ए.आर. इंटरप्राइजेस या कोर मेटल बॉक्स तयार करणाऱ्या कंपनीसह कमळापूर रोडवरील मे. गोल्डन बेकर अॅन्ड दूध डेअरी दुकानाला लागलेल्या भीषण आगीने वाळूज एमआयडीसी परिसरात रविवारी (८ मार्च) एकच हल्लकल्लोळ माजला. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत कोट्यवधी रुपयांचे साहित्य खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
कमळापूर रोडवरील मे. गोल्डन बेकर अॅन्ड दूध डेअरी दुकानाला आज, ९ मार्चला पहाटे २ च्या सुमारास (मध्यरात्री) भीषण आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत साडेतीन वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आगीत खारी, बिस्कीट, टोस्ट, दूध, दही तसेच वजन काटा, फ्रीज आदी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक शफीक इब्राहिम शेख यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बेकरी शॉप जळाल्याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घेतली.
आग विझविण्यासाठी जिवाची बाजी...
वाळूज एमआयडीच्या अग्निशमन दलातील सब फायर ऑफिसर अनिल देशमुख, फायर लीडर एल. जी. ब्रह्मणकर, एस. जी. वासनिक, एस. व्ही. पाटील, ऑपरेटर योगेश काळे, आर. जे. जाट, सी. एस. पाटील, पी. एस. खडे, एस. बी. सोनवणे, पी. के. राठोड, टी. बी. तांदळे, व्ही. एस. दाभाडे, पी. डी. घुगे, पी. आर. नागरोजा, बी. एम. महाले आणि एस. टी. मुळे यांनी आग विझविण्यासाठी जिवाची बाजी लावली. उन्हाळा सुरू झाल्याने आग लागण्याच्या घटना वाढत असून, अग्निशमन दलालाही अलर्ट राहावे लागत आहे.

