- News
- एक्सक्लुझिव्ह
- 'XXX शत्रू तो आपला मित्र’; हर्षवर्धन जाधवांना ठाकरे गटात प्रवेश मिळवून देण्यामागचं काय आहे षड्यंत्र...
'XXX शत्रू तो आपला मित्र’; हर्षवर्धन जाधवांना ठाकरे गटात प्रवेश मिळवून देण्यामागचं काय आहे षड्यंत्र?
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीची सूत्रे हाती असलेल्या अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने ठाकरे गटात ‘आयात’ केलेल्या उमेदवारांनी नंतर रंग दाखवले... राजू शिंदे यांनी थेट ठाकरे गटाला संपवून टाकण्याचीच भाषा केली. शहरातील एका उमेदवाराने तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर माघार घेऊन ठाकरे गटाला अडचणीत आणले होते. नंतरच्या उमेदवाराला पुरेशी तयारी करायलाही वेळ मिळाला नव्हता. दानवेंच्या पुढाकाराने आताही एक प्रवेश होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतित चेहऱ्याने, डोक्याला हात लावून बसले आहेत...
हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर जाधव यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली. नंतर जाधव यांनी मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यामुळे जाधव यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार, याबद्दल खात्रीलायकरित्या बोलले जाऊ लागले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू असल्याचे मानले जात आहे.
कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या विभक्त पत्नी संजनाताई जाधव या शिंदे गटाच्या आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत हे पती-पत्नी आमनेसामने ठाकले होते. २०१९ पूर्वी असलेली लोकप्रियता हर्षवर्धन जाधव यांची राहिलेली नसल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा काडीमात्र फरक संजनाताई जाधव यांना पडला नाही, की कोणत्या उमेदवारालाही त्यांचा फटका बसला नाही. अशा स्थितीत हर्षवर्धन जाधव यांना पक्षात आणून, त्यांना मजबूत करून संजनाताई जाधव यांच्यासमोर आव्हान उभे करायचे, एवढीच एकमेव खेळी यामागे दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
खैरेंचा का विरोध...
जाधव यांच्या प्रवेशाला विरोध करण्याबद्दल चंद्रकांत खैरे म्हणतात, की जाधव यांच्या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. याआधी ते मीनाताई ठाकरे यांच्याविषयी चुकीचे बोलले आहेत. शिवाय तो माणूस स्वतःच्या पत्नीविषयी, जी आमदार आहे तिच्याविषयीही चांगले बोलत नाही. अशा माणसाला आम्ही पक्षात प्रवेश घेऊ देणार नाहीत, असे खैरे यांचे म्हणणे आहे.
बेभरवशाचा राजकारणी...
हर्षवर्धन जाधव हे भाजप नेते रावसाहेब दावने यांचे तिसरे जावई आहेत. सध्या ते पत्नी संजनाताई जाधव यांच्यापासून विभक्त आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचे वडील रायभान जाधव हे सनदी अधिकारी होते. काही काळ ते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीय सहायकही होते. काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. जवळपास साडेबारा वर्षे ते कन्नडचे आमदार राहिले. १९९७ ला त्यांचे निधन झाले. रायभान जाधव यांच्या पत्नी नंतरच्या पोटनिवडणुकीत आमदार झाल्या. त्या अडीच वर्षे आमदार राहिल्या. १९९९ ला हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणात प्रवेश झाला. ते पिशोर गटाचे जिल्हा परिषद सदस्य झत्तले. कन्नड साखर कारखान्याचे चेअरमन झाले. २००९ मध्ये मनसेत प्रवेश करून ते आमदार झाले. १० वर्षे ते आमदार राहिले. पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणात राज ठाकरे यांनी सहकार्य न केल्याचा आरोप करून जाधव यांनी शिवसेनेची वाट धरली. २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार झाले. तो काळ असा होता, की खैरे यांच्या हातात जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे होती.
बाजार समितीच्या निवडणुकीत खैरे आणि जाधव यांचे खटकले तेव्हापासून दोघांतील राजकीय वैरत्व वाढत गेलं, ते नंतर इतकं वाढलं की खैरेंचे राजकीय करिअरच जाधवांनी धोक्यात आणले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन करून २ लाख ८३ मते घेतली होती आणि खैरे यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव झाला होता. दोघेही पराभूत होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. नंतरच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले आणि मनसेत परतले. नंतर पुन्हा मनसेतून बाहेर पडत भारत राष्ट्र समितीत दाखल झाले. अलीकडच्या काळात तर कुठेच नाहीत. आता पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. हर्षवर्धन जाधव यांचे राजकारण बेभरवशाचं राहिलं आहे, वडील रायभान जाधव यांच्याप्रमाणे प्रगल्भतेचं, परिपक्वतेचं राजकारण त्यांना करता आलं नाही, असंच नेहमी म्हटलं जातं.

