- News
- एक्सक्लुझिव्ह
- Political Exclusive : वर्चस्वाचे कोडे, युतीला तडे!; आ. बोरनारे, सत्तार यांच्या सत्ताकांक्षी भूमिकेला...
Political Exclusive : वर्चस्वाचे कोडे, युतीला तडे!; आ. बोरनारे, सत्तार यांच्या सत्ताकांक्षी भूमिकेला भाजपच्या ‘रणनिती’चे काय असेल उत्तर?
छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नगरपालिका निवडणुकांत सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांची सत्ता महत्त्वाकांक्षा जागरूक झाली असून, सिल्लोडपासून सुरू झालेला हा सिलसिला फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीपर्यंत येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात केवळ कन्नडमध्ये युतीची शक्यता आहे. अशा स्थितीत पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल आणि महापालिकेत कसे जागा वाटपावरून या पक्षांत घमासान होईल, याचा अंदाज येऊ लागला आहे.
सिल्लोडमध्ये आ. सत्तार यांनी एकट्याच्या बळावर नगरसेवक होण्याची आशा बाळगून असलेले २८ उमेदवार उभे केले आहे, तर भाजपने २५ जागांवर उमेदवार दिले आहेत. नगराध्यक्षपदासाठी मनोज मोरेल्लू यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीची सूत्रे भोकरदनहून हलत असल्याची चर्चा आहे. जालना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या पराभवात हातभार लावून कल्याण काळे यांना निवडून आणण्यात भूमिका बजावल्याचे वक्तव्य आ. सत्तार यांनी केले होते. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसले होते, आता सत्तारपूत्रच रिंगणात असल्याने पुन्हा भाजप आक्रमक झाली आहे.
वैजापूर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपचे डॉ. दिनेश परदेशी सरसावले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शिल्पा यांनीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे स्थानिक पदाधिकारी आ. बोरनारे यांच्या विरोधात आहेत. एकनाथ जाधव हे बंड पुकारत बोरनारे यांच्याविरोधात मैदानात उतरले होते तर माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांनी ठाकरे गटात जाऊन उमेदवारी मिळवत आ. बोरनारे यांना आव्हान दिले होते. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही जाधव आणि परदेशी यांना साथ दिल्याचे दिसून आले होते. तेव्हापासून भाजपचे अस्तित्व कमी करण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी आ. बोरनारे यांनी भाजपचे काही पदाधिकारीही फोडून शिंदे गटात घेतले आहेत. त्यामुळे काहीही करून नगरपालिका भाजपच्या ताब्यात राहिली पाहिजेत, असा प्रयत्न भाजपचा दिसून येत असून, त्यांना अजित पवार गटाची साथही लाभत आहे. त्यामुळे आ. बोरनारे एकटे पडले आहेत.
खुलताबादमध्ये स्वतंत्र लढाई
खुलताबाद पालिका निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत आहेत. शिंदे गटाने नगराध्यक्षपदासाठी बाबासाहेब बारगळ यांना उमेदवारी देऊन स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारल्यानंतर भाजपनेही परसराम बारगळ यांना उमेदवारी दिली आहे. हे थोडे म्हणून की काय अजित पवार गटानेही माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग यांना उमेदवारी बहाल केली. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट मात्र एकत्र येऊन ही निवडणूक लढत आहेत.
कन्नडमध्येही शिंदे गट स्वतंत्रच
कन्नड पालिका निवडणुकीतही शिंदे गट हा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळे राहूनच निवडणूक लढत आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी स्वाती कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे गटाने अनिता कवडे यांना उमेदवारी दिली आहे. मुख्य लढत शिंदे गट आणि अजित पवार गटात होणार, असे दिसून येत आहे.
पैठणमध्ये अजित पवार गटाचे हे काय भलतंच?
पैठणमध्येही शिंदे गट आणि भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. भाजपने माजी नगराध्यक्ष सुरेश लोळगे यांच्या पत्नी मोहिनी यांना उमेदवारी दिली, तर शिंदे गटाने आ. विलास भुमरे यांचे विश्वासू माजी नगरसेवक भूषण कावसानकर यांच्या पत्नी विद्या यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार राजकीय घराण्यातील असल्याने भाजप आणि शिंदे गटामध्येच सरळ लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत अजित पवार गट चक्क शिंदे गटासोबत आहे, तेही २५ पैकी अवघ्या दोन जागी नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करून. एकीकडे भाजपने कन्नडमध्ये थेट अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असताना, पैठणमध्ये असे अजित पवार गटाने झुकते माप का घेतले, यावर चर्चा सुरू आहे. भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. शरद पवार गट हा काँग्रेससोबत राहणार असल्याचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी म्हटले आहे.
गंगापूरमध्ये घराणेशाहीचा अंक...
गंगापूरमध्येही शिंदे गटाने एकला चलो रेचा मार्ग निवडला आहे. माजी आमदार कैलास पाटील यांचे पूत्र ऋषिकेश पाटील यांना शिंदे गटाकडून नगराध्यक्षासाठी उमेदवारी मिळाली. काहीच दिवसांपूर्वी कैलास पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. नंतर लगेचच त्यांच्या पुत्राला उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिवसेना फुटल्यापासून शिंदे गटात असलेल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दिसून येत आहे. घराणेशाहीचा हा अंक पुढे काय रंग घेतो, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे. भाजपने प्रदीप पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. अजित पवार गट, ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट सारेच गंगापूरमध्ये स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. कारण सर्वांच्याच उमेदवारांनी स्वतंत्रपणे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. अर्जही भरले आहेत.
फुलंब्रीत भाजप- अजित पवार गट एकत्र
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाने युती केली आहे, तर शिंदे गट स्वतंत्रपणे रिंगणात उतरला आहे. शिंदे गटाने आनंद ढोके यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, तर भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी बहाल केली. याशिवाय ठाकरे गटाने राजेंद्र ठोंबरे, काँग्रेसने मुदस्सर पटेल यांना मैदानात उतरवून नगरपंचायत ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले आहेत.

