Political Exclusive : आ. जैस्वाल-किशनचंद तनवाणी यांच्यातील ताणाताणी वाढली!; ‘पुत्रा’साठी मित्रप्रेम विसरले, विधानसभेत तनवाणींचा त्याग हिंदुत्वासाठी नव्हे तर पुत्रासाठी होता, हेही आले समोर!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी प्रभागातील खुल्या पुरुष प्रवर्गातून आपल्या पुत्रालाच उमेदवारी मिळावी, यासाठी आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यात ताणाताणी कायम आहे. एकमेकांविरुद्ध वक्‍तव्‍येसुद्धा झाली आहेत. ‘मेट्रोपोलिस पोस्ट-सिटी न्यूज’ने यासंदर्भातील विशेष वृत्त शनिवारी प्रसिद्ध केल्यानंतर शहरभर त्याची चर्चा झाली. तनवाणी हे विधानसभा निवडणुकीत केलेल्या त्यागाबद्दल बोलून दाखवत आहेत, तर आ. जैस्वाल यांनी कसला त्याग, असा प्रश्न करत पक्ष मुलगा म्हणून नाही तर कामांमुळे तिकीट देत असतो, असे सुनावले आहे. त्यामुळे पूत्रप्रेमापोटी दोन मित्रांत मोठाच वाद पेटला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने शुक्रवार आणि शनिवार (१२ आणि १३ डिसेंबर) इच्‍छुकांना उमेदवारी अर्जांचे निराला बाजार येथील पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात वाटप केले. शुक्रवारी ५३६ जणांनी तर शनिवारी २९२ जणांनी अर्ज नेले.

जैस्वाल-तनवाणींमध्ये वाढला ‘तणाव’
आ. प्रदीप जैस्वाल यांचे पूत्र ऋषिकेश यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज घेतला. त्यांना गुलमंडीतून निवडणूक लढायची आहे. दुसरीकडे किशनचंद तनवाणी हेही आपले पूत्र चंद्रकांत (बंटी) यांच्यासाठी गुलमंडीतूनच उमेदवारी मागत आहेत. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी उमेदवारी परत करत शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना पाठिंबा दिला होता. हे करत असताना त्यांनी हिंदुत्वाचा राग आवळला होता. मात्र आता त्यांनी केलेला त्याग कशासाठी होता हे सांगायला सुरुवात केली आहे.

त्यागाची परतफेड पक्षाने मुलाला उमेदवारी देऊन करावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यावेळचा त्याग हा हिंदुत्व किंवा मित्रप्रेमापोटी नाहीतर महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुलमंडी प्रभाग शिंदे गटासाठी अनुकूल आहे. त्यामुळे जैस्वाल आणि तनवाणी दोघांनाही खात्रीशीर प्रभाग पाहिजेत. तो गुलमंडीच असल्याने दोघेही हट्टाला पेटले आहेत. जैस्वाल यांची प्रकृती पाहता त्यांना आपला राजकीय वारसदार तयार करावा लागणार आहे. महापालिका निवडणूक ही त्यासाठी चांगली संधी आहे.

तनवाणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की गुलमंडीत खुल्या प्रवर्गातून माजी नगरसेवक म्हणून राजू तनवाणी यांचा पहिला हक्क आहे किंवा माझे चिरंजीव चंद्रकांत यांच्यासाठी मी उमेदवारी मागणार आहे. जैस्वाल यांचे निवासस्थान समर्थनगर प्रभागात आहे. त्यांनी मुलाला समर्थनगरमधून उभे करावे. शिवाय ते ओबीसी आहेत. गुलमंडीच्या खुल्या प्रभागातून त्यांनी यायला नको, अशी भूमिका त्यांनी घेतली. तर आ. जैस्वाल म्हणाले, की केवळ आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा म्हणून नव्हे तर पक्षबांधणीत ऋषिकेश सक्रिय असतो. १२ वर्षांपासून तो विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी आहे. त्याने रांगेत उभे राहून गुलमंडी प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज घेतला, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे कुणाच्या पारड्यात ठेवणार उमेदवारी?
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेला राजेंद्र जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला. जंजाळ यांना पक्षात सन्मानाचे स्थान देण्यात आले. त्यामुळे जंजाळ पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तयारीत व्यस्त झाले असून, त्यांच्या नेतृत्त्वात अर्जवाटपही झाले. आता सोमवार, मंगळवारी (१५ व १६ डिसेंबर) इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर मुख्य समन्वय समिती एकनाथ शिंदे यांना आपला अहवाल पाठवेल. त्याचबरोबर पक्षाकडून शहरात स्वतंत्र सर्वेक्षणही होईल. या दोन्ही अहवालांनंतर एकनाथ शिंदे हेच उमेदवारी अंतिम करणार आहेत. शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यास जसे शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, तसेच काँग्रेस, मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही अर्ज नेल्याचा दावा केला जात आहे.

तनवाणींचा जोर पालकमंत्र्यांवर...
शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज वाटप करण्याच्या दोन्ही तारखांना किशनचंद तनवाणी यांनी पुत्रासाठी उमेदवारी अर्ज नेला नाही. उमेदवारीचा दावा मात्र केला आहे. अर्जच नेला नाही तर उमेदवारी कशी मिळणार, याबद्दल पत्रकारांनी तनवाणींना छेडले असता त्यांनी मुलगा चंदू ऊर्फ बंटी अथवा भाऊ राजू यांच्यासाठी फॉर्म अद्याप घेतला नसल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांकडून फॉर्म घेऊन उमेदवारी मिळविणार असल्याचा दावा त्यांनी केला.

तनवाणींची खदखद
मी हिंदुत्वासाठी त्याग केला. सध्या माझ्याकडे लोकसभा संपर्कप्रमुखाचे पद आहे. पण कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मला दिले जात नाही. वृत्तपत्रात बातमी आली की मला कळते. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ मला जुनिअर आहेत. पण तरीही मी याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे, असे तनवाणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

तुपे-जंजाळांतील शीतयुद्ध सुरूच
दरम्यान, त्र्यंबक तुपे आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातील शीतयुद्ध काही कमी होताना दिसत नाही. गेल्या महिन्यात मंत्री शिरसाटांसोबतच्या वादामुळे जंजाळ हे काही अंशी बॅकफूटवर गेले होते. त्यावेळी अचानक त्र्यंबक तुपे हे पुढे आले होते. त्यांनी जंजाळांवर टीकाही सुरू केली होती. त्यांना आता जिल्हाप्रमुख करणार, महापौरपदासाठीही त्यांचा दावा असणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण एकनाथ शिंदे यांनी पुन्हा जंजाळांना पक्षात मानाचे स्थान दिल्याने तुपे यांची नाराजी सुरू झाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इतरांना पाठवले होते. मात्र राजेंद्र जंजाळ यांनी गावाकडे गेले असेल म्हणून अर्ज देता येत नाही. उमेदवारांनी स्वतः अर्ज घेण्यासाठी यावे, असे बजावले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत तुपे अर्ज नेण्यासाठी आले. अर्ज घेऊन लगेच निघूनही गेल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

Latest News

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software