- News
- एक्सक्लुझिव्ह
- श्वानांची काळजीवाहू... अपघात-आजारग्रस्त श्वान, मांजरींसाठी देवदूत बनल्या ३७ वर्षीय करुणा... शेल्टरमध...
श्वानांची काळजीवाहू... अपघात-आजारग्रस्त श्वान, मांजरींसाठी देवदूत बनल्या ३७ वर्षीय करुणा... शेल्टरमध्ये लेकराप्रमाणे जपतात, खंत बोलून दाखवली, म्हणाल्या...
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कुत्रा हा पाळीव प्राणी, पण जोपर्यंत तो पाळलेला असतो, तोपर्यंत आणि तोच लाडाचा असतो. रस्त्यावर फिरणारे श्वान पाहिले, की तितकेसे प्रेम कुणाचे जागृत होत नाही... उलट तिरस्कार आणि संतापाचे ते कारण ठरतात... श्वान तेच असतात, पण एक घरातला अन् बाहेरचा असा भेद असतो... अशा भेदांच्या पलिकडे गेलेली, भटक्या कुत्र्यांनाही मायेची पांघरुण घालणारी, त्यांना जणू लेकरांप्रमाणे जपणारी, त्यांची काळजी घेणारी एक भूतदयेचे अनोखी उदाहरण असलेली महिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे... हो ३७ वर्षीय करुणाताई गजेंद्र ब्रह्मे या जे करत आहेत, ते कदाचित तुमच्याआमच्यासारखे केवळ कल्पनाच करू शकतात. नावाप्रमाणे त्यांची करुणा मुक्या प्राण्यांसाठी जागृत होते, असे म्हणावे लागेल...
करुणाताई आणि त्यांच्याकडील एक कामगार असे दोघेच सध्या शेल्टरमध्ये काम करतात. हे कार्य करण्यासाठी अनेकदा आर्थिक निकड भासते. लोक अशावेळी मदतीसाठी पुढे आले पाहिजेत. प्रत्येकाला एवढं सर्व करणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी किमान अशा मार्गाने का होईना या मोहिमेला पाठिंबा दिला पाहिजेत. विवेक गोसावी यांनी मला पाहिलेलंसुद्धा नसताना ते महिन्याला २ हजार रुपये देतात. विनोद लाहोटी यांनी त्यांची जागा मला शेल्टरसाठी काही काळापुरती दिली. अनेक जण १००-२०० रुपये देत असतात, पण एवढ्याशा मदतीने या प्राण्यांची गरज भासत नाही. त्यासाठी दानशूरांनी पुढे यायला पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. प्रशासनाकडून तर अद्याप कसलेही सहकार्य मिळालेले नाही. मला अनेकदा अपघातांचे कॉल येतात. वाहन नसल्याने त्यांना रिक्षाने उचलावं लागतं. अनेकदा खासगी हॉस्पिटलमध्ये या प्राण्यांना दाखवावं लागतं. माझी खासगी हॉस्पिटलची उधारी आता १८ हजार रुपयांवर गेल्याचे करुणा यांनी सांगितले.
जे प्रशासनाने केले पाहिजेत, ते मी करतेय, कारण मला या प्राण्यांप्रती प्रचंड प्रेम आहे. मी प्रशासनाकडे शेल्टरसाठी पुरेशी जागा मागितली आहे. मात्र अजून तरी माझ्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. श्वान, मांजर, गाय हे प्राणी वर्षानुवर्षे आपल्यासोबत राहतात. पण अजूनही त्यांच्याप्रती आपली ममता जागरूक होत नाही. पाळलेल्या जनावराप्रती जेवढे प्रेम आपण दाखवतो, त्या प्रेमाचा थोडासा भाग का होईना, या भटक्या श्वान, मांजरींना मिळायला हवा. त्यांनाही अन्न, पाणी लागते. एखादा श्वान चावला म्हणून सर्वच श्वान चावतो असे नाही. एखादा माणूस जसा गुन्हेगार असतो, तसे सर्वच माणसे गुन्हेगार जसे आपण समजत नाही, तसेच श्वानांचेही आहे. श्वानासारखा प्रामाणिक आणि दयाळू कोणताच प्राणी नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
मोठे शेल्टर उभारण्याची इच्छा...
करुणा यांचे ध्येय आहे, की या प्राण्यांसाठी मोठे शेल्टर बनवावे. त्यात वेगवेगळ्या अपघातांनी ग्रस्त श्वान, मांजरींसह अन्य पाळीव प्राण्यांना ठेवावे. जे रस्त्यावर कधीच जगू शकत नाहीत, अशांना हक्काचे घर मिळावे, रात्री अपरात्री त्यांच्यावर या शेल्टरमध्ये उपचार व्हावेत, असे त्यांना वाटतं. पण त्यांचे हे ध्येय तेव्हाच शक्य आहे. जेव्हा त्यांच्याकडे येणारा निधी वाढेल. अशावेळी करुणाताईंचे हात आपणच भक्कम केले पाहिजेत... करुणाताई यांचा संपर्क क्रमांक आहे : 7058653639

