- News
- एंटरटेनमेंट
- अहंकार अन् निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपा...
अहंकार अन् निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
न्यू एज सिनेमा, नॉयर आणि कल्ट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे निर्माता-दिग्ददर्शक राम गोपाल वर्मा हे स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला रात, कौन, सत्या, कंपनी आणि सरकार असे अनेक संस्मरणीय चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा सध्या त्यांच्या सुपरहिट चित्रपट "रंगीला’च्या री-रिलीजमुळे चर्चेत आहेत. आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ अभिनीत हा चित्रपट ३० वर्षांपूर्वी १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानिमित्ताने राम गोपाल वर्मा यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या यश आणि त्यांच्या कमतरता दोन्हींवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्टपणे कबूल केले की "अहंकार’ आणि "निष्काळजीपणा’ या दोन कारणांमुळे त्यांचे चित्रपट नंतरच्या काळात अपयशी ठरले. इतकेच नाही तर त्यांनी असेही म्हटले, की त्यांची वादग्रस्त विधाने अशीच केलेली नसतात, जाणीवपूर्वक असतात...
रामगोपाल वर्मा : या वर्षी, मी ‘सत्या' पुन्हा प्रदर्शित केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मला वाटले की काही चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर प्रतिष्ठा मिळवतात. ‘रंगीला' त्यापैकी एक आहे. हा असा चित्रपट आहे ज्याची गाणी, संगीत आणि कथा या सर्वांमध्ये नवीन पिढीला आकर्षित करण्याची क्षमता आहे. शिवाय, जर चित्रपटाची कथा आणि पात्रे प्रत्येक काळात प्रासंगिक असतील तर तो चित्रपट कधीही जुना होत नाही. ‘रंगीला' मधील पात्रे आजही वास्तववादी आहेत. निर्मात्याला वाटले की तो फोर के तंत्रज्ञान आणि ध्वनी री-मास्टरिंग वापरून पुन्हा प्रदर्शित केला जाऊ शकतो. हा एक अतिशय भावनिक चित्रपट आहे. मिली (उर्मिला मातोंडकर) एक चांगली मुलगी आहे आणि मुन्ना (आमिर खान) देखील आहे. चित्रपटात खलनायक नाही, म्हणून लोकांना वाटले की तो खलनायकाशिवाय चालणार नाही. पण जेव्हा मी हॉलिवूडचा क्लासिक "द साउंड ऑफ म्युझिक’ पाहिला तेव्हा मला चित्रपटाचा सार समजला. मी तीच भावना "रंगीला’मध्ये समाविष्ट केली.
रामगोपाल वर्मा : मला वाटते की स्टार प्राइसिंगबद्दल एक गैरसमज आहे. स्टार किती मागतो, हा नंतरचा विषय आहे. पण तो मागत असलेली रक्कम देणारा काही मूर्ख नसतो. स्टारमुळे थिएटरमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर किती लोक येऊ शकतात याबद्दल पैसे देणाऱ्याचे गणित असते. तो सर्व गणिते केल्यानंतरच किंमत अदा करत असतो. त्यामुळे मला वाटत नाही की स्टार चुकीचे आहेत. ते स्वाभाविकपणे त्यांची किंमत आकारतात. जर स्टार इतका लायक नसेल तर त्यांना तेवढेही मिळणार नाही. सामान्यतः लोकांना हे गणित समजत नाही. कोट्यवधी रुपयांबद्दल ऐकून त्यांना हेवा आणि मत्सर वाटतो, परंतु पैसे गुंतवणारा व्यक्ती मूर्ख नाही. तो गणित समजतो.
रामगोपाल वर्मा : मला वाटत नाही की आजकाल कोणाकडे इतका विचार करायला वेळ आहे. अनुरागने असे कोणते प्रसंग अनुभवले ज्यामुळे त्याला असे पाऊल उचलण्यास भाग पाडले हे मी सांगू शकत नाही, परंतु आजच्या सोशल मीडियाच्या युगात, जेव्हा आपण काहीही व्यक्त करतो किंवा बोलतो तेव्हा बहुतेकदा त्याला अतिरेकी वेगळे रुप देऊन सादर केले जाते. कधीकधी ते चुकीचे सिद्ध होते. पण हीच सोशल मीडियाची इकोसिस्टम आहे. जेव्हा तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही, तेव्हा रागावण्याऐवजी त्यासोबत जगायला शिकले पाहिजे.
प्रश्न : अलीकडेच ‘गाझा’वरील तुमचे वक्तव्य असो किंवा बॉलीवूड अभिनेत्रींवरील (कियारा आदी) तुमचे ट्विट असो तुम्ही वादांनी वेढलेले आहात का? ते अनावधानाने होते की जाणूनबुजून?
रामगोपाल वर्मा : मी ट्विटर (एक्स) वर जे काही बोलतो ते पूर्ण जाणीवपूर्वक बोलतो. होऊ शकते, की माझी बोलण्याची पद्धत कधी कधी आऊट ऑफ कॉन्टेक्स असू शकते. जेव्हा मी गाझामधील व्हिडिओ पाहिले तेव्हा त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हे दिवाळीच्या आतषबाजीसारखे वाटत होते. मला वाटले की आपण येथे रॉकेट उडवत आहोत. पण तिथे खरे रॉकेट होते. मी त्याबद्दल विनोदाने व्यक्त झालो. लोकांना मी असंवेदनशील वाटलो. पण माझा हेतू चुकीचा नव्हता. तुम्ही काही बोललात तर कोणाला वाईटही वाटू शकते. टॉक्सिसिटी हा आजकाल मानवी स्वभावाचा एक भाग बनला आहे.

प्रश्न : तुमच्या सोशल मीडिया पोस्टवरून निर्माण झालेल्या वादांमुळे, आता तुम्ही काहीही बोलण्यापूर्वी जास्त सावध आहात का?
रामगोपाल वर्मा : नाही, कारण मी अशा देशात राहतो जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते एखाद्याने चुकीच्या पद्धतीने घेऊन माझ्यावर टीका केली म्हणून मी लगेच मागे हटणे आणि त्याबद्दल विचार करत राहणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही. मी व्यक्त होत राहील, लोकही त्यावर प्रतिक्रिया देत राहतील. माझे मत काही लोकांना पटेल आणि काहींना पटणार नाही.
प्रश्न : रात, रंगीला, सत्या, कौन, कंपनी, भूत आणि सरकारसारख्या अनेक यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांनंतर तुम्हाला ‘न्यू एज सिनेमा'चे दिग्दर्शक म्हटले जाते. तथापि, गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या तुमच्या चित्रपटांमध्ये ती जादू दिसत नाही. तुम्हाला काय कारण वाटते?
रामगोपाल वर्मा : याची अनेक कारणे आहेत. मी एकही कारण सांगू शकत नाही. परंतु मला वाटते की दोन मुख्य कारणे म्हणजे माझा अहंकार आणि माझा निष्काळजीपणा. अहंकार म्हणजे मला सर्वकाही माहित आहे असा विश्वास आणि निष्काळजीपणा म्हणजे मला परिणामांची पर्वा नाही असा विश्वास.
प्रश्न : तुमच्या सर्व नायिकांशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. तुम्ही काय म्हणाल?
रामगोपाल वर्मा : मी संदीप चौटासोबत सहा चित्रपट केले आहेत. मी अमेय चक्रवर्तीसोबत अनेक चित्रपट केले आहेत आणि अजय देवगणसोबत पाच चित्रपट केले आहेत. मी बिग बींसोबत सहा चित्रपट केले आहेत. कधीकधी तुमचे कामाचे नाते इतके घट्ट होते की तुम्हाला अनेक चित्रपटांमध्ये त्या कलाकारांसोबत काम करावे लागते, परंतु जर असेच काही महिला कलाकारांबद्दल घडले तर तुमचे नाव तिच्याशी जोडले जाते. आता, जर मी एखाद्या पुरुष अभिनेत्यासोबत जास्त चित्रपट केले असतील तर मला समलैंगिक म्हणावे लागेल. (हसतो) मी त्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. मी ते लोकांवर सोडतो, कारण मी नातेसंबंधांवर विश्वास ठेवत नाही.
प्रश्न : तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून करिअर घडवायचे होते. पण नंतर तुम्ही चित्रपट निर्मितीमध्ये सामील झालात. ते कसे घडले?
रामगोपाल वर्मा : बघा, माझ्यासोबत असं झालं की मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो, पण मी इंजिनिअरिंगचा अभ्यास केला नाही. मी कधीच इंजिनिअर झालो नाही. कारण मी खूप वाईट विद्यार्थी होतो. विद्यार्थी असताना, मी कॉलेजमध्ये काहीही शिकलो नाही. मी नेहमीच चित्रपटांचा शौकीन होतो. मी दिग्दर्शक बनण्याचा दृढनिश्चय केला होता. मी चित्रपटांच्या प्रचंड संग्रहासह एक व्हिडिओ लायब्ररी सुरू केली. मी स्वतःचा चित्रपट बनवण्यासाठी चित्रपट उद्योगातील लोकांना भेटत होतो. माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही. कारण त्यांना वाटत होते, की दिग्दर्शक बनणे हे फक्त माझे वेडेपण आहे.
प्रश्न : त्यावेळी तुमचा सर्वात मोठा संघर्ष कोणता होता?
रामगोपाल वर्मा : मी कोणत्याच प्रयत्नांना संघर्ष म्हणून पाहिले नाही. कारण मला असे वाटत होते की मला ब्रेक देणे ही कोणाचीही जबाबदारी नाही, तर तो मिळवून घेणे ही माझी जबाबदारी आहे. जर माझ्याकडे चित्रपट बनवण्याची प्रतिभा असेल आणि तरीही मी एखाद्याला तो बनवण्यासाठी पटवू शकत नसेन, तर ते माझे अपयश आहे. ते माझे विचार होते. मी सहाय्यक म्हणून काम केले. मी प्रयत्न करत राहिलो आणि मला संधी मिळाली.
प्रश्न : अलिकडच्या काळात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वादग्रस्त राहिले आहेत. अनेक वर्षांपूर्वी तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तुम्ही ‘शूल' साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. तुम्ही काय म्हणाल?
रामगोपाल वर्मा : मला राष्ट्रीय पुरस्काराची पर्वा नाही. आय डोंट केअर अवॉर्डस्. मी पुरस्कारांच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही. कारण माझा असा विश्वास आहे की फक्त काही मोजके लोक समोर येऊन तुमच्या चित्रपटाचे मेरीट ठरवू शकत नाहीत. मला माहित आहे की चित्रपट कसे बनवले जातात. कधीकधी, चित्रपट निर्मिती उद्योगातील लोकांनाही त्याच्या गुंतागुंतीची जाणीव नसते. मग चित्रपट किंवा शीर्षकाच्या आधारे बाहेरील व्यक्ती चांगले आणि वाईट कसे ठरवू शकते? म्हणून, मी ते मूलभूतपणे नाकारतो.
प्रश्न : तुम्हाला न्यू एज, नॉयर आणि गँगस्टर चित्रपटांचे तज्ञ मानले जाते. चित्रपटासाठी तुमची प्रेरणा काय आहे?
रामगोपाल वर्मा : माझ्यासाठी चित्रपट हेच चित्रपटांसाठी प्रेरणा ठरले आहेत. द साउंड ऑफ म्युझिक, द एक्सॉर्सिस्ट, द गॉडफादर आणि शोलेसारखे चित्रपट माझे प्रेरणास्थान राहिले आहेत. म्हणून, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि मी हे चित्रपट पाहिले तेव्हा माझ्यावर त्यांचा खूप प्रभाव पाडला. ‘द गॉडफादर'चा माझ्यावर खूप प्रभाव होता. जेव्हा तुम्हाला चित्रपट असा आवडतो, तेव्हा तुम्ही ते वेगळ्या संदर्भात, वेगळ्या कथेत आणि वेगवेगळ्या पात्रांसह पुनरुत्पादित करू इच्छिता. जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी तेच केले.

