मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बॉलिवूडचे "ही-मॅन’, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आज, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी जुहू येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांची प्रकृती बऱ्याच काळापासून गंभीर होती. त्यांच्या कुटुंबाच्या विनंतीवरून १२ नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण देओल कुटुंब आणि अनेक सिनेसृष्टीतील दिग्गज उपस्थित होते. हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल, बॉबी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्याही डोळ्यात अश्रू तरळत होते. धर्मेंद्र यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. धर्मेंद्र महिनाभरापासून श्वसनाचा त्रास अनुभवत होते. वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे ते जीवनाची लढाई हरले. सोमवारी दुपारी १२:३० वाजता त्यांच्या जुहू येथील घरी रुग्णवाहिका पोहोचली आणि अर्ध्या तासानंतर, मृतदेह विले पार्ले स्मशानभूमीत नेण्यात आला. कुटुंब आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांनी अंत्यविधी पार पडले. या दुःखाच्या क्षणाबद्दल कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
धर्मेंद्र यांचे ९० व्या वाढदिवसाच्या फक्त १४ दिवस आधी निधन झाले. ८ डिसेंबर रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस होता. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावात पंजाबी जाट कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील केवल कृष्ण देओल गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी झाले होते, त्यावेळी ते अवघ्या १९ वर्षांचे होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांचे पहिले लग्न झाले. पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुले सनी देओल आणि बॉबी देओल आणि दोन मुली विजेता आणि अजिता आहेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न केले. या लग्नामुळे बराच वाद निर्माण झाला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी यासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे वृत्त आहे. तथापि, राजकीय मोहिमेदरम्यान जेव्हा या अफवा पसरू लागल्या तेव्हा धर्मेंद्र यांनी दावा केला की ते हिंदू राहिले आणि त्यांचे कुटुंब आर्य समाजी होते. त्यांनी आणि हेमा मालिनी यांनी १९७० च्या दशकात ‘शोले’सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यापासून ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत.
सुपरस्टार धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटातून पदार्पण केले. या दशकाच्या मध्यात "आये मिलन की बेला’, "फूल और पत्थर’ आणि "आये दिन बहार के’सारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी प्रथम लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या असंख्य ऑन-स्क्रीन भूमिकांमुळे त्यांना भारतातील "ही-मॅन’ म्हणून ओळखले गेले. मात्र, १९६६ मध्ये आलेल्या ‘फूल और पत्थर’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली. या रोमँटिक ड्रामामध्ये धर्मेंद्र मीना कुमारीच्या सोबत दिसले होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चमकदार आणि संस्मरणीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात देखणे आणि यशस्वी चित्रपट स्टार मानले जातात. सहा दशकांहून अधिक काळाच्या सिने कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक हिट चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम धर्मेंद्र यांच्या नावावर आहे. १९८७ मध्ये त्यांनी एकाच वर्षात सलग सात हिट आणि नऊ यशस्वी चित्रपट दिले होते.
अलिकडच्या काळात अनेक चित्रपट
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांनी "प्यार किया तो डरना क्या’, "लाइफ इन अ... मेट्रो’, "अपने’, "जॉनी गद्दार’, "यमला पगला दीवाना’, "रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि "तेरी बातें में ऐसा उलझा जिया’ यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या. धर्मेंद्र आता शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसतील, परंतु त्यांचे चित्रपट, त्यांच्या कथा आणि त्यांच्या आठवणी लोकांच्या हृदयात कायम राहतील.
राजकारणही गाजवलं...
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीनंतर धर्मेंद्र राजकारणात आले होते. २००४ मध्ये ते राजकारणात सक्रिय झाले. भाजपने बिकानेर लोकसभा मतदारसंघातून धर्मेंद्र यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणूक जिंकली. जवळपास ५७ हजार मतांनी विजय मिळवत खासदार झाले. मात्र खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारण सोडले. त्यांचे कुटुंब मात्र आजही राजकारणात आहे. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी भाजपच्या खासदार आहेत. त्यांचे पुत्र सनी देओल भाजपचे खासदार राहिले आहेत.